गरिबीवर मात, स्वप्नांची भरारी : इल्मा अफरोज यांचा संघर्षमय यशप्रवास, वाचा…!

टीम AM : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील एका छोट्या गावात जन्मलेल्या इल्मा अफरोज यांची कहाणी आज लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अवघ्या 14 व्या वर्षी कॅन्सरमुळे वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. अनेकदा घरात दोन वेळच्या जेवणाचीही चिंता असायची. अशा कठीण परिस्थितीतही इल्मा यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही.

जिथे इतर विद्यार्थी कोचिंग क्लासेस आणि आधुनिक सुविधांच्या मदतीने अभ्यास करत होते, तिथे इल्मा मेणबत्तीच्या प्रकाशात तासनतास अभ्यास करून आपल्या स्वप्नांसाठी झटत होत्या. समाजातील अनेकांनी “मुलगी आहे, तिला घरातच ठेवा” असा सल्ला दिला. मात्र त्यांच्या आईने मुलीच्या शिक्षणासाठी खंबीरपणे साथ दिली.

आपल्या मेहनतीच्या बळावर इल्मा यांनी दिल्ली विद्यापीठातील सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीमुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि पुढील शिक्षणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात जाण्याची सुवर्णसंधीही प्राप्त झाली.

संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी ‘युपीएससी’ सारखी देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आणि ‘आयपीएस’ अधिकारी बनून स्वतःचं नशीब स्वतः लिहिलं. इल्मा अफरोज यांची यशोगाथा सांगते, ‘परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्नांवर विश्वास ठेवणारे आणि मेहनत न सोडणारेच इतिहास घडवतात‌.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here