नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील करिअर संधी

प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे

मनोरंजन ही मानवाची नितांत गरज आहे. या गरजेतून मनोरंजन क्षेत्र उदयास आले. प्राचीन काळापासून मनोरंजन क्षेत्राकडे कला म्हणून पहिले जाते. आज हे क्षेत्र व्यवसायाचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात मनोरंजनाचा मोठा प्रपात विविध वाहिन्यांद्वारे सुरू आहे. याचा परिणाम आपल्या संस्कृतीवर झाला आहे. पूर्वी आदिवासी संस्कृती, ग्रामीण संस्कृती आणि नागर संस्कृती अशी संस्कृतीची तीन पदरी विभागणी करता यायची, आता मात्र या तीनही संस्कृतीची सरमिसळ झाली असून, लोकल ते ग्लोबल हा चौथा स्तंभ तयार झाला आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य, विज्ञान, कला शाखांसोबतच संस्कृतीच्या वाहक अशा प्रयोगात्म कलांचेही आकर्षण निर्माण झाले आहे. नाटक, चित्रपट, नृत्य, कंठसंगीत, वाद्यसंगीत यांच्यासोबतच लोककलांचे आकर्षणही वाढू लागले आहे. हिंदी, मराठी वाहिन्यांवरील रिऍलिटी शोमधून लोकसंगीत आणि लोकनृत्याच्या स्पर्धा अगदी हमखास असतात इतकेच काय तर अनेक चित्रपटांना आणि नाटकांना लोककलांचे अपूर्व योगदान लाभले आहे. नाट्य व चित्रपट क्षेत्रात करिअर करायचंय असं जर तुम्ही ठरवलं असेल तर तुमच्यासाठी असंख्य संधी उपलब्ध आहेत. निर्माता, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, पटकथाकार, गीतकार, संगीतकार, नृत्य दिग्दर्शक, समीक्षक, संकलक, नेपथ्यकार, ध्वनी आयोजक, मंच व्यस्थापक, रंगभूषाकार, वेशभूषाकार, गायक, प्रसिद्धिप्रमुख, जाहिरात विभाग, प्रकाश योजनाकार यांच्यासह अनेक व्यावसायिक संधी आज उपलब्ध आहेत. आज लोककलेतही करिअर करता येईल.

लोककलांना आजवर लोकमान्यता आणि राजाश्रय होताच पण एके काळी गावच्या वेशीबाहेरच्या कला अशी संभावना झालेल्या या लोककलांना विद्वत मान्यता प्राप्त झाली ती सुमारे 157 हून अधिक दीर्घ वर्षांची परंपरा असणाऱ्या मुंबई विद्यापीठात. सन 2004 साली तत्कालीन कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाने लोककलेचा पदव्युत्तर पदविका पातळीवरचा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात लोककला अकादमीच्या रूपाने सुरू झाला. लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांनी या अकादमीची धुरा हाती घेतली. आज या अकादमीत 13 वर्षांच्या वाटचालीत शेकडो विद्यार्थी लोककलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन त्यातून आपले यशस्वी करिअर घडवू शकले आहेत. या अकादमीचे प्रमुख म्हणून प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे व प्रा. मोनिका ठक्कर, डॉ. शिवाजी वाघमारे, प्रा. योगेश निकम कार्यरत आहेत. लोककलेच्या क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंतांची मांदियाळी हे लोककला अकादमीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. अकादमीच्या सल्लागार समितीवर दिवंगत लोकशाहीर विठ्ठल उमप, तर सध्या महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे, डॉ. जब्बार पटेल, प्रा. वामन केंद्रे यांचे अपूर्व मार्गदर्शन लाभले होते. डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. तारा भवाळकर, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. मधुकर वाकोडे, डॉ. यशवंत पाठक, डॉ. रामचंद्र देखणे असे या क्षेत्रातील दिग्गज अभ्यासक विद्यार्थ्यांना मागदर्शन करीत असतात. ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या चंदाबाई तिवाडी, भारूडरत्न निरंजन भाकरे, डॉ. तुलसी बेहेरे, प्रख्यात नृत्यदिग्दर्शिका दीपाली विचारे, डॉ. शत्रुघ्न फड, शाहीर सुरेश जाधव, शाहीर देवानंद माळी, लावणीसम्राज्ञी छाया – माया खुटेगावकर, राजश्री नगरकर, छगन चौगुले, कमलबाई शिंदे, असे कलावंत, अभ्यासक विद्यार्थ्यांना अकादमीत प्रात्यक्षिके शिकवीत असतात. लोकवाद्य, तालवाद्यांचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक विजय चव्हाण, कृष्णा मुसळे, नृत्याच्या प्रशिक्षण देणाऱ्या हेमाली शेडगे, गायनाचे प्रशिक्षण देणारे मदन दुबे, अभिनय – लोककला प्रशिक्षक योगेश चिकटगावकर यांनी अकादमीतील विद्यार्थ्यांना मनोरंजन क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध होतील या दृष्टीने अथक प्रयत्न केले आहेत.

गोंधळ, जागरण, तमाशा, भारूड, दशावतार, शाहिरी अशा प्रयोगात्म लोककलांचे प्रशिक्षण अकादमीत दिले जाते. या प्रयोगात्म लोककलांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक क्षेत्रात, मनोरंजन क्षेत्रात करिअरच्या संधी प्राप्त होतात. वृत्तपत्र क्षेत्रात सांस्कृतिक प्रतिनिधी, शासकीय निमशासकीय संस्थांत कार्यक्रम अधिकारी, समन्वयक, शाळा – महाविद्यालयांमध्ये संगीत नृत्यशिक्षक, संशोधन संस्थांमध्ये संशोधन समन्वयक, दूरचित्रवाणी आणि चित्रपट क्षेत्रात पूर्णवेळ व्यावसायिक कलावंत अशा संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होतात.

कुठल्याही शाखेचा पदवीधर या पदव्युत्तर पदविकेचे लोककलांचे शिक्षण घेऊ शकतो. लोककला अकादमीत लोककलांचे संशोधन केंद्र शाहीर अमरशेख अध्यासन अस्तित्वात आहे. पीएच.डी. चे केंद्रही लोककला अकादमीत सुरू असून बारावीनंतरचा लोककलांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरू आहे. यामध्ये लोकवाद्य वादन, लोकनृत्य, लोकगीत गायन, लोकनाट्य असे प्रशिक्षण दिले जाते. मनोरंजनाच्या क्षेत्रात हमखास करिअरच्या या अभ्यासक्रमाने संधी प्राप्त होऊ शकतात. आपण जर निर्धार केला तर या क्षेत्रात आपण प्रसिद्धीसह भरपूर प्रमाणात पैसेही मिळवू शकतो.

मराठवाड्यात नाट्यशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे विभाग प्रमुख डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. बोदेले, प्रा. साबळे, प्रा. दांडगे, डॉ. शिंदे, उस्मानाबद उपकेंद्र परिसर, तसेच स भू. महाविद्याल,औरंगाबाद येथे प्रा. किशोर शिरसाठ, प्रा. रमाकांत भालेराव, प्रा. प्रेषित रुद्रवार, प्रा. नितीन गरुड, देवगिरी महाविद्यालयात डॉ. अनिलकुमार साळवे, प्रा. बोरसे, छत्रपती महाविद्यालय, औरंगाबाद डॉ. वळेकर, प्रा. धोंडगे, के. एस. के. महाविद्यालय बीड येथे डॉ. संजय पाटील देवळाणकर, डॉ. रामटेके, बलभीम महाविद्यालय, प्रा. शेटगार, सावरकर महाविद्यालय, बीड, एस. आर. टी. महाविद्यालय, अंबाजोगाईत डॉ. संपदा कुलकर्णी, डॉ. उंडणगावकर, संत रामदास महाविद्यालय, घनसावंगीत डॉ. राजू सोनवणे, प्रा. सिद्धार्थ तायडे, गुरु पार्डीकर महाविद्यालय, शिरसाळा डॉ. कणसे, प्रा. फुलारी, प्रा. देवकर, पारध या ठिकाणी प्रा. राजू शिंदे, माजलगाव येथे प्रा. भोले आदी मंडळी नाट्यशास्त्र विषयाचे प्रशिक्षण देत आहेत. याच बरोबर लोककला विभाग, मुंबई विद्यापीठ मुंबई, थिएटर आर्टस विभागात डॉ. बनसोड, योगेश सोमण, ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथे डॉ. भोळे, प्रा. गरुड, नाट्य विभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, नाट्यविभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, परफॉर्मिंग आर्ट्स संकुल, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड येथे नाथा चितळे, प्रा. पुपुलवार, नागपूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, FTII पुणे, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ वर्धा येथे डॉ. सतिश पावडे हे नाट्यप्रशिक्षण देत आहेत.

यांसह देशभरात अनेक ठिकाणी जाऊन आपण नाट्य व चित्रपट कलेचे शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण घेऊ शकतो. या ठिकाणी सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेऊन आपण आपले व्यावसायिक करिअर करू शकतो. सिने – नाट्य क्षेत्रातील करिअरच्या या सुवर्णसंधी नवी आव्हाने पेलणांऱ्यासाठी सदैव खुल्या आहेत.

  • लेखक आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त सिनेनाट्य, अभिनेता – दिग्दर्शक, समीक्षक, संशोधक आहेत. – प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे, औरंगाबाद. मो. 9822836675