टीम AM : तंगलानचा शब्दशः अर्थ ‘सन ऑफ गॉड’ परमेश्वराचा पूत्र. या चित्रपटात तंगनाल आपल्या पूर्वजांची कथा सांगत आहे. ही कथा जमिनीच्या स्वामित्वाची आहे. त्यावरील राबणाऱ्या कष्टकरी, वेठबिगार यांच्या गौरवशाली इतिहासाचा शोध घेणारी कथा आहे.
भारताच्या इतिहासातील उपेक्षित शोषितांच्या अस्मिता आणि अस्तित्वाचे प्रश्न तंगलानच्या प्रतिनायकाद्वारे या चित्रपटात येतात. जात वर्ग आणि स्त्रीदास्यांताच्या प्रश्नांची उकल हा चित्रपट करतो. बहुस्तरीय आशयसूत्र असलेला हा चित्रपट वेगवेगळ्या ऐतिहासिक कालपटांची गाठोडी कथनातून उलगडून दाखवतो. कृषिसंस्कृती ते औद्योगिकरण या प्रदीर्घ काळाचे कथन या चित्रपटात येते.
सिंधू संस्कृती, नागवंशीयांचा इतिहास, स्त्रीसत्ताक आणि पुरुषसत्ताक गणराज्यांचा संघर्ष, वैदिक आणि अवैदिक काळातील पुरोहितशाहीचे प्रभुत्व, वसाहतपूर्व आणि वासाहतिक काळातील बदलते सत्तासंबंध वंचितांच्या दृष्टीने मांडून त्यातील प्रतिकाराचा आवाज येथे अधोरेखित केला आहे. वेदना, विद्रोह, नकार याबरोबरच आत्मभान जागृत झालेला प्रतिनायक क्रांतीसन्मुख होतो. तंगलान हा नायक समूहसंवेदना घेऊन व्यक्त होतो तो आपल्या अस्तित्व आणि अस्मितेसाठी. ही कथा केवळ तंगलान ची नाही, ती उपेक्षित नाकारलेल्या समूहाची आहे. त्यांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेची आहे.
‘कोलार येथील सोन्याच्या खाणीचा शोध घेणाऱ्या लोकांची कथा’ बहुरेषीय आहे. वेगवेगळ्या काळातील हा शोध आहे. तो सोन्याच्या खाणीचा शोध आहे. ही खाण इथल्या उपेक्षितांची आहे. हा शोध आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेचा आहे. सम्यक जाणिवांचा आहे.
सरंजामशाही विरुद्ध सर्वहारा शोषितांच्या सांस्कृतिक भांडवलाची पुनर्मांडणी करणारी कथा विविध ऐतिहासिक घटना, कथा, प्राकथा, प्रतिमा, रूपके, दृश्य चिन्ह यांचा उपयोग करून प्रभावी केली आहे. हत्तीसारखा दिसणारा डोंगर आणि त्याच्या आसपास असलेली बुद्ध मूर्ती, जिचे शीर ब्राह्मणी व्यवस्थेने मध्ययुगीन काळात धडापासून वेगळे केले आहे आणि ते परत बुद्धाच्या धडाला त्याचे शीर जोडणारा वसाहतकालीन अशोक तंगलानचा मुलगा. शांतीप्रिय चक्रवर्ती अशोकाच्या परंपरां आणि पाऊलखुणा दाखवतो. ती परंपरा या चित्रपटात वेगवेगळ्या बंधांतून आली आहे. जात वर्चस्वकाळात गेलेली प्रतिष्ठावासहातीक काळात परत मिळण्याची शक्यता निर्माण होते. अस्पृश्य तंगलान घोड्यावर बसून, बंदुक घेऊन गावात येतो. आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेची भाषा बोलू लागतो. वेगवेगळ्या काळातील ऋतू त्यातील निसर्ग बदल, कथनासाठी पर्यावरणात होत गेलेले बदल अनेक संदर्भांसह चित्रपटात दृश्यमान होतात.
लेखक, दिग्दर्शक जात वर्चस्ववादी आणि कृषिसंस्कृतीवर अवलंबून असलेल्या लोकांच्या प्रतिमांचा प्रभावी उपयोग करून समकाळातील आत्मभान जागृत करतात. दलित, आदिवासी, भूमीहीन, शेतमजूर, शेतकरी हे नागवंशी सिंधू संस्कृतीचे वारस एकच आहेत अशी मांडणी करून इतिहासाचे पुनर्वाचन पा रणजित करतात.
विस्तीर्ण कालावकाश असलेला हा चित्रपट सादरीकरणाच्या शैलीची लवचिकता ठेवतो. ही लवचिकता लोकतत्त्वांची आहे. विविध दृश्य प्रतिमांचे संकेतार्थ चित्रपट कथेत एकरूप झाले आहेत.
हे बहुआवाजी कथनातून आशय आविष्काराची सेंद्रिय एकात्मता पाह्यला मिळते. तंगलान आपल्या मुलांना आपल्या पूर्वजांची कथा सांगत चित्रपट सुरू होतो. गर्भनाट्य उलगडत जाते. बहुस्तरीय कथन येते. आंबेडकरवादी वास्तव आणि दिग्नाक प्रमाणाधारित जादुई वास्तवात हा चित्रपट शैलीबद्ध केलेला आहे. तंगलान आणि नागनिका आरती यांचे अंतस्थ संवाद दाखवण्यासाठी जादुई वास्तवाचा उपयोग केला आहे, परंतू, हा चित्रपट काल्पनिक वा अद्भूत नाही. चित्रपट शैलीची व्यामिश्रता अनुभवायला मिळते. नेणीवेतील स्तर उलगडून दाखवत जाणिवा बहिर्मुख होतात. लोकसंगीत, लोकनृत्य यांचा वापर करून वास्तववादी अभिनय शैली नेमकेपणाने वापरली आहे.
हा चित्रपट म्हणजे शूद्र पूर्वी कोण होते ?, अस्पृश्य मूळचे कोण ?, या प्रश्नांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी उकल केली आणि क्रांती आणि प्रतिक्रांती, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील विचारांचे चित्रपटशैलीत भाष्य आहे. आंबेडकरवादी विचारांचा व्यापक अवकाश या चित्रपटात आहे. आंबेडकरवादी इतिहास दृष्टीने या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. आशय आणि चित्रपट अभिव्यक्ती म्हणून हा चित्रपट प्रेक्षकांना भावेल.
– डॉ. अनिल सपकाळ