टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात ऐन सणासुदीच्या दिवशी एक दुखःद घटना घडली आहे. मराठा आरक्षण आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेलं नुकसान या कारणास्तव देवळा येथील शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. ही घटना आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी घडली आहे. या घटनेमुळे देवळा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील देवळा या गावातील शेतकरी मारुती ज्ञानोबा पवार यांनी आज त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशात पेनाने लिहिलेली चिठ्ठी आढळून आली आहे. या चिठ्ठीत त्यांनी लिहिले आहे की, मी मारुती ज्ञानोबा पवार आत्महत्या करत आहे. माझी शेती अति पावसामुळे नापीक झाली आहे. माझे दोन मुलं शिक्षण घेऊन बेरोजगार फिरत आहेत. तरी मायबाप सरकारने मराठा समाजाला आरक्षण नाही. त्यामुळे माझे लेकरं बेरोजगार आहेत. म्हणून हे टोकाचे पाऊल उचलले आहे’.
दरम्यान, मृत्यू पश्चात मारुती पवार यांना पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी आहे. घटनास्थळी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांचे पथक दाखल झाले असून घटनेचा अधिक तपास करित आहेत.