‘आप की कसम’ : जीवनात अतिशय महत्वाचा संदेश देणारा चित्रपट

टीम AM : संशय व गैरसमज वाळवीसारखे असतात. वाळवीप्रमाणेच संशय व गैरसमज वेळीच दूर झाले नाहीत तर नात्यांना पोखरत जाते. आतून पोकळ झालेले नाते केव्हा पत्त्यांच्या घरासारखे कोसळतात, कळतही नाही. जीवनात अतिशय महत्वाचा संदेश देणारा चित्रपट, ‘आप की कसम’. 

एक तरुण (राजेश खन्ना) आणि एक तरुणी (मुमताज) दोघांचं कॉलेजमध्ये प्रेम जमतं आणि लग्नही होतं. मित्राच्या (संजीव कुमार) वशिल्याने तरुणाला नोकरी मिळते आणि त्याच्याच घरासमोर घर. तरुणी स्वभावाने मोकळी असते. सगळं ठीक सुरु असताना एक दिवस तरुण त्याच्या पश्चात पत्नीला आणि मित्राला गप्पा मारताना पाहतो आणि त्याच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळतो. हा किडा त्याचं डोकं पोखरत जातो, गैरसमज वाढत जातात. त्यात त्याच्या मित्राचं आणि त्याच्या पत्नीचं पटत नसतं. यामुळे आपल्या पत्नीचं आणि मित्राचं नक्कीच काहीतरी प्रकरण आहे, हे समजून तो पत्नीला सोडून देतो. मित्र परोपरीने समजावतो पण त्याचा संशय त्याच्यावर हावी असतो. कालांतराने त्याचे गैरसमज दूर होतात. तो माफी मागायला तरुणीच्या माहेरी जातो तेव्हा तिचं दुसरं लग्न झाल्याचं त्याला कळतं. वेळ निघून गेली असते. पश्चाताप करूनही फायदा नसतो ! योगायोगाने एक दिवस तो मित्राला सापडतो, तरुणीला कळतं, ती त्यांच्या मुलीच्या विवाहात त्याला कन्यादानासाठी बोलावते, तो जातो पण ओळख दाखवत नाही, शेवटी ओळख पटते वगैरे.. 

हा चित्रपट आवडण्याचं कारण म्हणजे त्या तरुणाला त्याच्या संशयी स्वभावाची मिळालेली शिक्षा. वेळ गेल्यावर आलेल्या शहाणपणाला काही अर्थ नसतो हा अतिशय मोलाचा संदेश. चित्रपट असल्याने हिरो हिरोइनचा गैरसमज दूर होऊन त्यांचा संसार सुखाचा होईल, असं आपल्याला वाटत राहतं पण तसं होत नाही. म्हणूनच चित्रपटातील संदेश जास्त परिणामकारक ठरतो. प्रत्यक्ष जीवनातही क्वचितच योगायोग असतात. एरवी अशा घटनांचा अंत हा दुःखीच असतो. 

चित्रपटात राजेश खन्ना, मुमताज, संजीव कुमार यांची मुख्य भूमिका आहे. इतर भूमिकांमध्ये रहमान, सत्येन कप्पू वगैरे आहे. सर्वच कलाकार कसलेले आहेत. चित्रपटातील मधूर संगीत ही देखील जमेची बाजू आहे. आनंद बक्षी यांच्या अर्थपूर्ण गीतांना आर. डी. बर्मन यांनी सुरेल संगीत दिलंय. करवटें बदलते रहे, सारी रात हम, जय जय शिव शंकर, जिंदगी के सफर में.. वगैरे अतिशय सुंदर गाणी आहेत. चित्रपटातील काश्मीर दर्शन डोळ्यांना सुखद वाटतं. 

“कुछ लोग जो सफ़र में बिछड़ जाते हैं

वो हज़ारों के आने से मिलते नहीं

उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम

वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते

ज़िंदगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम

वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते…”

…निःसंशय !! 

आसावरी इंगळे