अंबाजोगाईत तीव्र इंधन टंचाई : पेट्रोल पंपांवर गर्दी कायम, प्रशासनाचे दावे फोल…!

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात इंधनटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून पेट्रोल पंपांवरील नागरिकांची गर्दी काही केल्या कमी होताना दिसत नाही. पेट्रोल – डिझेलच्या तुटवड्यामुळे वाहनचालकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे, तर अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.

अंबाजोगाई तालुका प्रशासनाने ‘परिस्थिती नियंत्रणात येत असून लवकरच इंधन पुरवठा सुरळीत होईल’ असे दावे केले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक पेट्रोल पंपांवर अजूनही ‘ पेट्रोल – डिझेल संपले आहे’ अशी पाटी दिसत असल्याने अंबाजोगाईकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागातही हीच परिस्थिती असून काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रकारही समोर येत आहेत.

विशेष म्हणजे, काही पंप सुरू असले तरी तेथे प्रचंड गर्दी होत असल्याने व्यवस्थापन कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे रोजच्या कामकाजावर परिणाम होत असून शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे.

दरम्यान, इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी कंपन्यांशी समन्वय सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, जमिनीवरील परिस्थिती पाहता हे दावे फोल ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये पसरली आहे. नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असले तरी ‘आधी इंधन उपलब्ध करून द्या’ अशी मागणी अंबाजोगाईकरांकडून जोर धरत आहे. इंधनटंचाईचा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here