टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे मंगळवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत कुलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून 26 वर्षीय नजीर खदीर सय्यद यांचा मृत्यू झाला. सकाळी साडेआठच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नजीर सय्यद हे रोजच्या प्रमाणे कामावर जाण्याच्या तयारीत होते. यावेळी घरातील लोखंडी कुलरमध्ये पाणी टाकत असताना अचानक कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरला. जोरदार धक्का बसताच ते जागीच कोसळले. घरच्यांनी तत्काळ वीजपुरवठा बंद करून त्यांना रुमच्या बाहेर काढत स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या नजीर यांच्या अकाली निधनाने सय्यद कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आठ महिन्यांची चिमुकली मुलगी आणि वृद्ध आई – वडील असा परिवार आहे. कुटुंबाचा एकमेव कमावता हात गेल्याने त्यांच्या पुढे उपजीविकेचे मोठे संकट उभे ठाकले आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विद्युत उपकरणे वापरताना विशेष काळजी घ्यावी, विशेषतः कुलरमध्ये पाणी भरताना वीजपुरवठा पूर्णपणे बंद असल्याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.



