डॉल्बीच्या तालावर धम्माल ! घरच्या लग्नात अजय – अतुलचा भन्नाट डान्स… व्हिडिओ व्हायरल…!

टीम AM : भारतीय चित्रपटसृष्टीतील अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी संगीतकार जोडी म्हणून अजय-अतुल यांना ओळखलं जातं. अजय व अतुल गोगावले हे सख्खे भाऊ आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील ‘सैराट’, ‘वेड’ या गाजलेल्या सिनेमांपासून ते हिंदीतील ‘अग्निपथ’, ‘धडक’ या चित्रपटांना अजय – अतुल यांचं संगीत लाभलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाला सुद्धा अजय – अतुल यांनीच संगीत दिलं आहे.

अजय – अतुल यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नुकताच त्यांचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी आजवर अजय-अतुल यांचे म्युझिक स्टुडिओमधील किंवा लाइव्ह कार्यक्रमात परफॉर्मन्स सादर करतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण, नुकताच त्यांचा लग्नाच्या वरातीत डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

अजय-अतुल यांचा हा डान्स व्हिडीओ त्यांच्या Samrudhi Thopte आणि त्यांच्या फॅनपेजनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अजय – अतुल लग्नाच्या वरातीत डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. समृद्धीने हा व्हिडीओ शेअर करत याला, “अजय-अतुल जेव्हा स्वत:च्या गाण्यांवर घरच्या लग्नाच्या वरातीत डान्स करतात” असं कॅप्शन दिलं आहे.

या व्हिडीओमध्ये अजय आणि अतुल हे दोघंही भन्नाट एनर्जीसह डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला त्यांनी “डॉल्बीवाल्या बोलव माझ्या डीजेला…” या गाण्यावर ठेका धरला होता. तर, व्हिडीओमध्ये पुढे अतुल आणि त्याचा मुलगा मल्हार गोगावले हे दोघंही “झिंगाट…” गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. अजय-अतुलच्या ‘झिंगाट’ गाण्याने तर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र धुमाकूळ घातला होता. हे ‘सैराट’ सिनेमातील गाणं आज 10 वर्षांनीही सर्वत्र लोकप्रिय आहे.

नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. दरम्यान, ‘राजा शिवाजी’नंतर आता अजय – अतुल ‘राणाबाली’ या तेलुगू सिनेमाच्या संगीताची जबाबदारी सांभाळणार आहेत. यामध्ये विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा 11 सप्टेंबर 2026 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here