तामिळनाडूच्या सत्तासमीकरणात दलित राजकारण ‘किंगमेकर’ : विजय यांच्या सरकार स्थापनेसमोर नवा पेच, वाचा…!

टीम AM : सुपरस्टार विजय थलपती यांच्या नेतृत्वाखालील (TVK) पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करत 108 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 जागांपासून पक्ष दहा जागांनी दूर असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सरकार स्थापनेसाठी आता ‘दलित’ राजकारण करणाऱ्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरत आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील दलित पँथर चळवळीच्या प्रेरणेवर उभ्या राहिलेल्या (VCK) या पक्षानेही यंदाच्या निवडणुकीत दोन आमदार निवडून आणत आपली ताकद दाखवून दिली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाचे दोन खासदार निवडून आले होते. देशभरात दलित राजकारणाला सातत्याने संघर्ष करावा लागत असताना, तामिळनाडूत मात्र स्थानिक प्रमुख पक्षांसोबत आघाडी करत (VCK) ने प्रभावी परिस्थिती निर्माण केली आहे.

सध्या विजय थलपती (TVK) आणि थोल. थिरुमावलवन (VCK) यांच्यातील वाटाघाटींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (VCK) कडून उपमुख्यमंत्रीपदाची मागणी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, हीच मागणी सरकार स्थापनेतील मोठा अडथळा ठरत असल्याचे बोलले जात आहे. विजय यांचा शपथविधी देखील त्यामुळे लांबणीवर पडल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने (TVK) ला पाठिंबा जाहीर केला असला तरी, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी (VCK) तसेच (IUML) यांसारख्या पक्षांचा पाठिंबा आवश्यक मानला जात आहे. दुसरीकडे (AIADMK) नेही राजकीय हालचाली सुरू करत आपल्या आमदारांना पुद्दुचेरीतील रिसॉर्टमध्ये हलवल्याची चर्चा आहे.

विजय यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा सादर केला असला तरी, बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मिळवणे हे त्यांच्यासमोरील मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत दलित पक्ष आणि लहान गट कोणाच्या बाजूने उभे राहतात, यावर तामिळनाडूचा पुढील मुख्यमंत्री निश्चित होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here