धक्कादायक ‌: ‘त्या’ बाळाची प्राणज्योत मावळली, ‘स्वाराती’ चा कारभार पुन्हा चव्हाट्यावर, चौकशीचे आदेश

टीम AM : ‘स्वाराती’ रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. प्रसूतीनंतर जिवंत नवजात बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होते. या घटनेमुळे एकच‌‌ खळबळ उडाली होती. पण आता दुर्दैवाने त्या बाळाची प्राणज्योत मावळली आहे. बालरोग विभागातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असतानाचं बाळाने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे ‘स्वाराती’ चा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत ‘स्वाराती’ प्रशासनाने ‌चौकशीचे आदेश दिले आहेत.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात एका बाळाला जन्मानंतर मृत घोषित करण्यात आले होते. बाळाची योग्यरित्या तपासणी न करता हा निर्णय घेण्यात आला होता. कुटुंबियांनी बाळाला घरी आणले, जिथे अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. याचवेळी बाळ अचानक रडू लागले. बाळाचे रडणे ऐकून कुटुंबियांना सुखद धक्का बसला आणि त्यांनी तातडीने बाळाला पुन्हा रुग्णालयात दाखल केले. ‘त्या’ बाळावर बालरोग विभागातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. ‘त्या’ बाळाचा काल रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे बाळाची आई बालिका घुगे व त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने दोन समित्यांची नियुक्ती केली आहे. एका समितीमध्ये संबंधित विभागाचे विभागप्रमुख आहेत, ज्यांना तात्काळ चौकशी करून अधिष्ठातांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरी समिती इतर विभागांमधील प्राध्यापक आणि विभागप्रमुख अशा पाच लोकांची आहे, त्यांनाही या घटनेची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. ‘आम्ही स्वतःहून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन कमिट्या तयार केलेल्या आहेत,’ असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here