‘स्वाराती’ साठी 189 कोटी मंजूर : मंत्री हसन मुश्रीफ

खाटांची दुरुस्ती, वसतिगृहाच्या कामांना गती देणार, विधानसभेत दिली माहिती

टीम AM : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने 181 कोटींच्या प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य नमिता मुंदडा, श्रीजया चव्हाण यांनी विधानससभेत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 150 ‘एमबीबीएस’ व 87 पीजी विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेनुसार शैक्षणिक व रुग्णसेवा सुविधा असून क्षमतेच्या तुलनेत रुग्णसंख्या अधिक असल्याने तातडीने सुधारणा आवश्यक आहे. त्यासाठी 280 खाटांची दुरुस्ती, 250 क्षमतेच्या वसतिगृहाचे बांधकाम, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, डांबरी रस्त्यांचे बांधकाम तसेच ‘जीएनएम’ महाविद्यालयाचे ‘बीएससी’ नर्सिंगमध्ये रुपांतर करणे. यासाठी सन 2024 – 25 आणि 2025 – 26 या दोन आर्थिक वर्षांसाठी 181 कोटी रुपयांच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

सर्व आरोग्य सुविधा या आर्थिक वर्षातच कार्यान्वित

याचबरोबर रिक्त प्राध्यापक पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालयात कॅन्सर उपचारासाठी एल – 1, एल – 2, एल – 3 सुविधांची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी नवीन धोरण लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे. तसेच, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, कार्डिओलॉजी यांसारख्या सुपर स्पेशालिटी सेवा उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘एनपीएनजीसी’ योजनेंतर्गत प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या सर्व आरोग्य सुविधा या आर्थिक वर्षातच कार्यान्वित करण्यात येतील, असे आश्वासनही वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी सभागृहात दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here