मुंबई : लैला मजनू या मध्य – पूर्वेतील लोककथेचा काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणातील आधुनिक आविष्कार आहे. एकमेकांशी वैर असलेल्या दोन घराण्यांतील लैला आणि मजनू हे एके रात्री एकमेकांना भेटतात आणि एका अजरामर प्रेमकथेचा आरंभ होतो.
आपल्या नाट्यमय प्रणयाने प्रेक्षकांवर मोहिनी टाकण्याबद्दल विख्यात असलेल्या इम्तियाझ अली या नामवंत निर्मात्यांनी या अमर प्रेमकथेची कथा लिहिली असून ती प्रेक्षकांना गुंतवून टाकील. इम्तियाझ अली यांचे बंधू साजिद अली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यात अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी या नवोदित कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ‘अॅण्ड पिक्चर्स’वर शनिवार, 14 सप्टेंबर रोजी रात्री 8.00 वाजता ‘सॅटर्डे प्रीमिअर नाइटस’मध्ये लैला मजनू चित्रपटाच्या ‘जागतिक टीव्ही प्रीमिअर’चे प्रसारण केले जाणार आहे.
या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारा अविनाश तिवारी म्हणाला, “लैला मजनू ही अमर प्रेमकथा असून आजच्या काळातील पिढीच्या लैला मजनूचा चेहरा होण्याचं भाग्य मला लाभलं, याबद्दल मी आनंदी आहे. ही प्रेमकथा आजच्या काळात तर तितकीच लागू होते पण ती लगेच पटतेही आणि म्हणूनच ही व्यक्तिरेखा साकारणं ही माझ्यासाठी खास गोष्ट बनली आहे. मी जेव्हा ही भूमिका रंगविण्याचा निर्णय घेतला, तेव्हा या प्रेमकथेशी मजनूला प्रामाणिक राखण्याला मी महत्त्व दिलं आणि सामाजिक बंधनांतून मुक्त होण्याचा निश्चय केला.
आपल्या या पहिल्या चित्रपटाबद्दल तृप्ती डिमरी म्हणाली, “हा माझा पहिलाच चित्रपट आहे, म्हणून नव्हे, पण एरवीही लैला मजनूच्या कथेला माझ्या मनात खास स्थान आहे. कारण प्रेम हे शिकवलं जात नाही किंवा त्याची व्याख्या करता येत नाही; तर त्याचा फक्त स्वीकार करायचा असतो, हे मला या कथेने शिकवलं. आता ही अजरामर प्रेमकथा साकारण्याची संधी मला मिळाल्याने मी पूर्णपणे भारावून गेले होते कारण ही कथा मी लहानपणापासून ऐकत आले आहे. अर्थात आमच्या चित्रपटातील मजनूची कथा ही मूळ कथेपेक्षा किंचित वेगळी असून ती आजच्या काळाच्या संदर्भात जोडून घेतली आहे. यातील लैलाची भूमिका साकारणं हे एक आव्हान होतं, पण त्या अनुभवानेच मला संपन्नही केलं. चित्रपटातील लैला ही स्वच्छंदी आणि मनमोकळ्या स्वभावाची असून आपण सर्वांचं लक्ष वेधून घेतो, ही गोष्ट तिला आवडत असते.