टीम AM : कमल हसन – श्रीदेवीच्या अभिनयाचा आविष्कार ‘सदमा’ चित्रपटाच्या रिलीजला 42 वर्षे पूर्ण झाली. दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटातील काही वेगळे आशयघन कथा असलेल्या चित्रपटांची हिंदीत रिमेक झाली. त्यातील बालू महेन्द्रू दिग्दर्शित ‘सदमा’ च्या प्रदर्शनास आज यशस्वी 42 वर्षे पूर्ण होत आहेत.
बालू महेन्द्रू यांनी आपल्याच ‘Moondram Pirai’ या तमिळ चित्रपटाची हिंदीत रिमेक केली. कमल हसन आणि श्रीदेवीच्या अभिनयाचा आविष्कार या चित्रपटात पाह्यला मिळतो. श्रीदेवीच्या ग्लॅमरस इमेजपेक्षा वेगळे रुपडे या चित्रपटात आहे. त्याशिवाय गुलशन ग्रोव्हर, लीला मिश्रा, पेंटल इत्यादींच्याही भूमिका या चित्रपटात आहेत. तसेच डाॅ. श्रीराम लागू, आशालता बावगावकर, पद्मा चव्हाण, विजू खोटे आणि अरविंद देशपांडे यांच्याही उल्लेखनीय भूमिका आहेत.
सिल्क स्मिथा हिच्यावर ‘ओ बबुआ वो महुआ’ मादक गीत नृत्य आहे. या चित्रपटाची गाणी गुलजार यांची तर संगीत इलया राजा यांचे आहे. ‘ये जिंदगी गले लगा ले’ – सुरेश वाडकर, ‘सुरमई अखियो मे एक सपना दे जा रे’ – येसूदास ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.
या चित्रपटाचे संवाद गुलजार यांचे आहेत. तर राज सिप्पी आणि रोमू सिप्पी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर ऑपेरा हाऊस होते. पण या चित्रपटाचे जेवढे कौतुक झाले तेवढे व्यावसायिक यश न मिळाल्याने आश्चर्य वाटलं.
शब्दांकन : संजीव_वेलणकर