तुला अखेरचा लाल सलाम कॉम्रेड… 

टीम AM : जवाहर भवनमधील एका कार्यक्रमापूर्वी बाहेर पॅसेजमध्ये सगळेजण चहा पित होते. बाजूला पुस्तकांचा स्टॉल होता. तिथं काहीजण पुस्तकं चाळत होते. मीही तिथली पुस्तकं चाळत असताना, बाजूला एकजण एखाद्या हिशेबशूर म्हातारीने प्रत्येक नोट निरखून-पारखून पाहावी नि पुढे करावी, तसं हा माणूस करत होता. मी त्याच्याकडे पाहिलं, ते कॉ. येचुरी होते. मला हा माणूस पहिल्यांदा असाच प्रत्यक्ष दिसला. हा असाच सर्वसामान्य माणसासारखा दिसावा किंवा दिसेल, अशीच काहीशी अपेक्षा होती की काय मनात, माहीत नाही, पण त्यामुळे त्यांच्या पैसे मोजण्याच्या त्या कृतीनं फारसं आश्चर्य वाटलं नाही.

कॉ. येचुरी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ गटातले होते. दिल्लीतल्या दिग्गज नेत्यांमध्ये त्यांची उठबस असे. तरी आपल्यातला अस्सल कम्युनिस्टपणा त्यांनी कधीच सोडला नाही. किंवा त्या कम्युनिस्टपणाने त्यांना कधीच सोडलं नाही, असं म्हणूया. हे अधिक परफेक्ट होईल.

कधी इंडिया इंटरनॅशनल सेंटर, कधी इंडिया इस्लामिक सेंटर, कधी जवाहर भवन, कधी कॉन्स्टिट्यूशन क्लब… अशा दिल्लीतल्या मातब्बरांच्या अड्ड्यांवर तेही असायचे. विषय बऱ्याचदा पुस्तकाचाच असायचा. किंवा देशासमोरील समस्यांचा. त्यांच्या बोलण्यात कायम एक तळमळ दिसायची. ती इतर नेत्यांसारखी बोलण्यापुरती कधीच वाटली नाही. खरीखुरी वाटली. कायमच.

कोरोना काळात त्यांचा तरुण मुलगा गेला. त्यानंतर मुलाच्या विषयावर एक – दोन ठिकाणी बोलताना ऐकलं, तेव्हा बोलता बोलता पाणावलेले डोळे आणि गळ्यात अडकलेले शब्द माझ्या नजरेतून सुटलं नाही. किंवा कुणाच्याच. आता ते गेल्यानंतर अनेकांनी म्हटलंही की, मुलाचा धक्का त्यांना सहन झाला नाही. असेलही तसं. आणि असलं तरी ते सहाजिक आहे. पण कॉम्रेड त्याहून कणखर होता. त्याला घरदार, संसारापलिकडचंही दु:ख टोचत राही. तो ते शक्य तिथे बोलत राही. शक्य तिथे मांडत राही.

एका मुलाखतकारानं विचारलं, कम्युनिस्ट विचारधारेकडे तरुणांना का खेचू शकत नाही तुम्ही ? त्यावर तो म्हणाला, ‘तुम्ही म्हणता ते खरं आहे, आता तुम्ही तरुणांनीच काहीतरी करा.’ कॉम्रेड कायम आशावादी राहिला. समोर चांगलं बोलणारा माणूस चांगलाच वाटत राहिला का त्याला ? की चांगुलपणावर त्याचा गाढा विश्वास होता ? काहीही असेल. पण हा देश कुठल्यातरी वाईटाच्या खाईत लोटला जातोय, असं त्याला वाटत असतानाही त्यानं चांगल्यावरचा, सकारत्मकतेवरचा विश्वास ढळू दिला नाही. तो आशावादी राहिला, कम्युनिस्ट विचारधारेबद्दलही आणि माणसांबद्दलही. त्याचा आशावाद त्याच्यासोबत गेला की उरलाय इथल्या भोवतालात, माहित नाही. पण त्याच्यापुरता होता, हे निश्चित.

गेली पाच – सहा वर्षे दिल्लीत असल्यानं इथल्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहता येतं. ही इथली जमेची बाजू. तिचा बराचसा फायदा मी उठवलाय. कॉ. येचुरींना प्रत्यक्ष ऐकण्याचा याच फायद्याची सर्वोत्तम बाजू.

काही महिन्यांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंवरील पुस्तकाचं दिल्लीत प्रकाशन होतं. कॉ. येचुरीही आले होते. आळीपाळीने प्रत्येकाची भाषणं सुरू होती. पुस्तकापेक्षा देशातील सद्यस्थिती हाच अनेकांच्या बोलण्याचा विषय होता.

आधीच्या चार – पाच वक्त्यांनी भारतातील सद्यस्थितीवर बोलताना वारंवार ‘पोलरायझेशन’ ही टर्म वापरली. नंतर कॉ. येचुरी बोलण्यासाठी आले आणि म्हणाले, पोलरायझेशन वगैरे झूठ आहे, हे सरळसरळ डिह्युमनायझेशन सुरू आहे.

भोवतालाचा शार्प अभ्यास असणारे नेते होते कॉ. येचुरी. कम्युनिस्टांची एकूणच निवडणुकीय राजकारणातील ताकद कमकुवत असण्याच्या काळात कदाचित कॉ. येचुरींबद्दल तितकसं कुणाला काही वाटणार नाही. कारण कुणी गेल्यावरही गर्दी दिसल्यावरच त्याचं मोठेपण कळण्याच्या उथळ काळात जगतोय आपण एकूणच. हा माझा भ्रमनिरास नाहीय. हेच वास्तव आहे. असेल काहीप्रमाणात. पण हेच आहे, हे निश्चित. तर असो. मुद्दा हाच की, कॉ. येचुरी हा इथल्या गोरगरीब – दीनदुबळ्या जनतेबद्दल तळमळीने, स्वच्छ मनाने आणि खऱ्याखुऱ्या सहवेदनेनं बोलणाऱ्या नेत्यांपैकी एक नेता होता.

राजकीय नेत्यांच्या प्रतिमा, काम आणि वर्तन वगैरे सर्वच अनेकविध बऱ्यावाईट छटांनी भरलेलं असताना, इतकं निष्कलंक आणि चांगल्या मनाचा नेता राजकारणाच्या वर्तुळात टिकून राहिला, हेच नवल. हे कम्युनिस्टांनाच जमावं, हेही खरं.

कुणी लक्षात ठेवो अथवा न ठेवो, तू इथल्या लोकांसाठी काहीएक तळमळीने बोलू पाहिलंस, हे कायम लक्षात राहील. कायम. हा तुला अखेरचा लाल सलाम कॉम्रेड.

– नामदेव काटकर