टीम AM : मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या जलदूताच्या जीवनाला प्रेरित होऊन, सत्यघटनेवर आधारित ‘पाणी’ चित्रपट येत्या 18 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून त्यातील आदिनाथ कोठारेचा लूक समोर आला आहे. या पोस्टरची सर्वत्र चर्चा होत असतानाच चित्रपटाच्या टीमने लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेत ‘पाणी’ चित्रपटाचा टिझरही लाँच केला. त्यामुळे एकाच वेळी ‘पाणी’ चे पोस्टर आणि टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टिझर पाहून हनुमंत केंद्रे या महान व्यक्तीचे आयुष्य जवळून जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.
आदिनाथ कोठारे दिग्दर्शित या चित्रपटात हनुमंत केंद्रे यांची भूमिका आदिनाथ कोठारे स्वतः साकारणार असून यात रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशा दमदार कलाकारांची मांदियाळी असणार आहे. ‘पाणी’ ची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा,जोनस, डॉ. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.
मराठवाड्यात पाण्याची भीषण परिस्थिती आहे, हे सर्वश्रूत आहे. येथील अनेक जण गाव सोडून जात असतानाच हनुमंत केंद्रे या तरुणाने तिथेच राहून गावकऱ्यांसाठी पाणीपुरवठा आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रवास निश्चितच सोप्पा नव्हता. गावात पाणी नाही म्हणून, त्यांचे लग्नही होत नव्हते. त्यांच्या आयुष्यातील हाच संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. टिझरमध्ये त्यांची प्रेमकहाणीही दिसत आहे, आता ती पूर्ण होतेय का ? गावात पाणी आणण्यात हनुमंत यांना यश येते का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला ‘पाणी’ पाहून मिळणार आहेत.