केज मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी निवडणूक लढवणार : रमेश तात्या गालफाडे

केज मतदारसंघात रमेश तात्या गालफडे यांना गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद

टीम AM : केज विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचे वारे जोरात वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अश्यातच मतदारसंघात एका नावाची जोरदार चर्चा सुरू असून ते नाव म्हणजे रमेश (तात्या) गालफडे. गालफाडे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असून त्याच दृष्टीने मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आहे. गावागावात मतदारांचा वाढता कल त्यांना पाहायला मिळत आहे. केज मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी मी निवडणूक लढवणार असल्याचे रमेश तात्या गालफाडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

केज मतदारसंघाची निवडणूक निर्णायक राहणार असून यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. केज मतदारसंघात सामाजिक बांधिलकी जोपासत गेल्या 20 वर्षापासून गालफाडे मतदारांच्या अडीअडचणीला धावून आले आहेत. त्यामुळे गालफाडे तात्या यांचे मतदारांशी ऋणानुबंध जुळून आले आहेत. कोरोना काळातही जनतेच्या सेवेसाठी त्यांनी रुग्णवाहिका अविरत सुरू ठेवली होती. त्यासोबतच किराणा सामानांची किट गोरगरिबांना मोठया प्रमाणात उपलब्ध करून दिले होते. या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल जनतेने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती. फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या अधीन राहून त्यांनी राजकारणाची वाट धरली असून गेल्या दोन – तीन महिन्यापासून केज मतदारसंघात तळ ठोकून जनतेच्या भेटी – गाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असो की सार्वजनिक गणेश मंडळाच्या आरती, या सोबतच सर्वधर्मियांच्या उत्सवाला ते सहभागी होऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे भाषेवर प्रभुत्व, सखोल अभ्यास आणि मतदारांशी संवाद साधण्याची पद्धत यामुळे मतदारही त्यांना पसंती देत आहेत.

केज मतदारसंघाचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार 

केज मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून राखीव मतदारसंघ असुन, मतदारसंघात मागासवर्गीयांची अवस्था काय आहे ? हे सर्वांना परिचित आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मिती प्रश्न असो की बुटेनाथ साठवण तलाव आणि काळवटी साठवण तलावाची उंची वाढविण्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित आहे. त्यासोबतच मतदारसंघात ‘एमआयडीसी’, उद्योगधंद्याची साधने नसल्यामुळे अनेक युवक बेरोजगार फिरत आहेत. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मतदारसंघातील अनेक शासकीय इमारतींचे बांधकाम रखडले आहेत. हे सर्व जिव्हाळ्याचे प्रश्न पूर्ण करण्यासाठी मतदारांच्या आशीर्वादाची मला गरज असून या निवडणुकीत ते मला निश्चितच आशीर्वाद देतील. अशी अपेक्षा रमेश रमेश तात्या गालफाडे यांनी व्यक्त केली. दरम्यान, केज मतदारसंघात निवडणुकीच्या अगोदरच राजकीय वातावरण तापले असून गालफाडे यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे, हे मात्र निश्चित आहे.