विधानसभा निवडणूक : खा. शरद पवारांच्या भेटीला राजेसाहेब देशमुख : काय झाली चर्चा ? वाचा.. 

टीम AM : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. नेत्यांच्या गाठीभेटी, सभा, दौरे यांना वेग आला आहे. अशातच आज बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे गुरूवार, दिनांक 12 सप्टेंबर रोजी खा. शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओकवर दाखल झाले. 

या भेटीनंतर राजेसाहेब देशमुख यांनी या भेटीत काय घडलं याबाबतची माहिती दिली आहे. खा. पवारांच्या भेटीवेळी परळी विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने चर्चा झाली. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. काँग्रेसला ही जागा मिळावी, अशी आम्हाला अपेक्षा राहील. खा. शरद पवार हे मोठ्या मनाचे ज्येष्ठ नेते आहेत, याबाबत सकारात्मक विचार करतील अशी अपेक्षा आहे, असे राजेसाहेब देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. 

दरम्यान, परळी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक आहेत. उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.