मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी व्यक्त केली खंत
अंबाजोगाई : आपत्तीग्रस्त गावांवर सर्व स्तरावर मदतीचा प्रचंड ओघ फक्त पंधरादिवसाच्या कालावधी पर्यंतच असतो, मात्र आपत्तीग्रस्त कुटुंबीय जेंव्हा पंधरा दिवसानंतर आपल्या घरी परत येतात तेंव्हाच त्यांना ख-या मदतीची गरज असते, मात्र यावेळी सर्वस्तरातुन येणारी मदत बंद होते आणि तेथून पुढे मानवलोकचे खरे कार्य सुरु होते, असे मत मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील अनेक गांवे नुकतीच महापुराने निर्माण केलेल्या भायनक परिस्थितीत उध्दवस्त झाली. या गावात पुराच्या हाहाकारात उध्दवस्त झालेल्या अपत्तीग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी मोठे काम करणाऱ्या मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांच्याशी “अक्षर मानव च्या संवाद” या मासिक मैफलीत हितगुज साधला असता अनिकेत लोहिया यांनी तेथील परिस्थिती व मदतकार्याची माहिती देतांना आपले मत व्यक्त केले.
आपल्या विस्तृत विवेचनात अनिकेत यांनी ८ ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील पदमाळे या गावात बोट उलटून १७ लोकांना जलसमाधी मिळाल्याची बातमी विविध वाहिन्यावर सांगितल्या गेली आणि या धक्कादायक बातमीनंतर संपुर्ण महाराष्ट्राला तेथील पुरपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात येवून सर्वस्तरातुन मदतीचा प्रचंड ओघ सुरु झाला असल्याचे सांगितले. मानवलोक कार्यालयात ९ ऑगस्ट रोजी या संदर्भात आयोजित बैठकीत मानवलोकचे कार्यकर्ते किशन शिनगारे हे प्रचंड विमनस्क मानसिक स्थितीत दिसून आले. मिटींग संपल्यानंतर आपण किशन शिनगारे याचेशी प्रत्यक्ष बोललो तेंव्हा त्याने पदमाळे गावातील गंभीर परिस्थिती सांगितली आणि आपला मोठा भाऊ आणि वहिनी हे दोघेही दोन दिवसांपासुन संपर्काबाहेर असल्याचे सांगितले. आणि याच क्षणी मानवलोकची पहिली टीम सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना झाली.
पदमाळे हे गांव चार नद्यांच्या संगमावर असलेले गाव होते. त्या गावाच्या खालच्या बाजुला या तीन – चार नद्यांच्या संगमपात्रात असलेलया राजापुर वाडी, नृसिंहवाडी, कुरणवाड, सुखवाडी, राजावाडी या गावात तर पदमाळे या गावापेक्षाही अधिक गंभीर परिस्थिती होती. या परीसरात २००५ साली आलेल्या महापुरानंतर शासनाने या गाव परीसरातील नदीपात्रालगतची पुर नियंत्रण रेषा निश्चित केली होती. सदरील पुरनियंत्रण रेषा सोडुन या रेषेलगतच्या भागात अलिकडे मोठी रहिवासी वस्ती वाढली. या पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यामुळे पुर नियंत्रण रेषेपेक्षा सहा फुट पाणी पातळी वाढल्यामुळे या परीसरातील सर्वच गावांना पुराचा अनपेक्षित मोठा फटका बसला. अनेक गावातील घरे पाण्याखाली गेली, जनावरांचे खुप नुकसान, अनेक जनावरे दलदल असलेल्या भागात मृतावस्थेत आढळून आली. अनेक गोठ्यात दावणीला बांधलेल्या गायी, म्हशी दावणीलाच मृतावस्थेत आढळून आल्या. चिखलाची दलदल आणि मृत अवस्थेतील जनावरांची दुर्गंधी सर्वदुर पसरलेली असताना या जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी साळेगाव केंद्रावरुन तीन जेसीबी मागवून जनावरांची विल्हेवाट लावण्यातआली.
पुरग्रस्तांच्या गरजा लक्षात घेवून अंर्तवसत्रांचा (अंडरपँट- बनियन) अभाव लक्षात घेवून महिला व पुरुषांना ही वस्त्रे पुरवण्यात आली, नवीन कपडे घेवून वाटप करण्यात आले. गांजी येथून चादर-ब्लँकेट, जिवनावश्यक इतर वस्तुंच्या कीट वाटप, आवश्यक असलेल्या ५ – ६ गावात कम्युनिटी किचन चालू केले. ब्रम्हणाळ येथे पहीले किचन सुरु करुन एका वेळी ७०० – ८०० लोकांना तर ५ – ६ गावातील कम्युनिटी किचन हॉल मधून १५ ते २० हजार लोकांना उत्कृष्ट जेवणाचा लाभ मिळवून दिला.हे जेवन बनवण्यासाठी बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेकडो तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सांगली जिल्ह्यातील वसगडे, खटाव, सुखवाडी, बोरबन, माळेवाडी, चोपडेवाडी, भिलवडी, दिग्रज, कुरुंदवाड या आणि इतर गावात गरजूंना वैद्यकीय उपचार व सेवेसह आवश्यकत्या सर्व सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न असंख्य संस्था आणि दानशुर लोकांच्या मदतीतुन करण्यात आला. ही सर्व मदत गरजू लोकांपर्यंत पोहंचवण्यासाठी त्या भागातील रहिवासी असलेले मनोज सेठ बियाणी (अंबाजोगाईच्या मुंदडा परीवाराचे जावाई) यांची मोठी मदत झाली. ही मदत करण्यासाठी अंबाजोगाई शहरातुन विविध सामाजिक संघटना सह, विविध सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, सामान्य नागरिक यांची मोठी मदत झाली. अंबाजोगाई तालुक्यातील २२ खेड्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी सामाजिक भान लक्षात घेवून दहा – पाच रुपयांची एकुण ८० हजार रुपयांची केलेली मदत खुप मोलाची ठरते. या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अंबाजोगाई शहर आणि परीसरातुन किमान ५० लाखांची मदत या पुरग्रस्तांसाठी करण्यात आली असावी असेही त्यांनी सांगितले.
आपल्या विस्तृत हितगुजाचा समारोप करतांना अनिकेत यांनी आपत्ती ग्रस्तांना सर्व स्तरातून सुरु असणारा हा मदतीचा ओघ फक्त पंधरादिवसच सुरु असतो. जेंव्हा ही आपत्तीग्रस्त कुटुंबे आपल्या घरात निवासासाठी परत जातात तेंव्हा ख-या मदतीची गरज त्यांना असते आणि अशा काळातच मानवलोकचे मदतकार्य ख-या अर्थाने सुरु होते. असे मत व्यक्त केले.
प्रारंभी या कार्यक्रमात अक्षर मानव चे ज्येष्ठ मार्गदर्शक अमर हबीब व सदस्य बालाजी शेरेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक बालाजी सुतार यांनी अमर हबीब यांच्या जीवन कार्याचा आढावा घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात अंबाजोगाईचे भुमीपुत्र अलीम आजीम यांना उर्दु साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा अक्षर मानवच्या वतीने सत्कार करण्यात आला.
काँम्प्युटर वर्ल्ड येथे आयोजित करण्यात आलेल्या या संवाद मैफिलीचे प्रास्ताविक मुजीब काजी यांनी केले तर यावेळी दगडु लोमटे, संतोष मोहीते यांनी या मदत कार्यातील सहभागाची माहिती दिली. अक्षर मानवच्या अध्यक्षा अनिता कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास अक्षर मानवचे सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.