परळीत संत सेवालाल महाराजांचे भव्य मंदिर, सभागृह उभारणार
परळी : आरक्षणापासून ते तांडा, वस्ती योजना बंद करण्यापर्यंत बंजारा समाजाच्या सर्व मागण्यांबाबत फडणवीस सरकारने समाजाची फसवणुक केली आहे. आपण या समाजाच्या सर्व मागण्या पुर्ण करण्याची जबाबदारी खांद्यावर घेत आहोत, त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत आशिर्वाद द्या, असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. परळीत 50 लक्ष खर्चुन सेवालाल महाराज मंदिर व भव्य सभागृह बांधुन देण्याचा शब्द ही त्यांनी दिला.
परळी विधानसभा मतदार संघातील बंजारा समाज बांधवांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन आज परळीत करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. जगमित्र नगर येथे झालेल्या या मेळाव्यास ह.भ.प. प्रेमदास महाराज, रा.कॉं.तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, युवक नेते अजय मुंडे, पं. स. सभापती मोहनराव सोळंके, डी.एस. राठोड सर, साहेबराव चव्हाण, रावसाहेब राठोड, कुंडलिक जाधव आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ.राजश्रीताई मुंडे यांनी ही शेवटी उपस्थित महिलांशी संवाद साधुन सर्वांची मने जिंकुन घेतली.
यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, बंजारा समाजाच्या मतावर सत्तेवर आलेल्या या सरकारने आणि येथील लोकप्रतिनिधीने भावनिक बनवुन मते घेतली, मात्र आज तांड्यावर गेलो की, तांड्याची अवस्था पाहुन मनाला वेदना होतात. अण्णांचा मुलगा म्हणुन मतदार संघातील सर्व तांड्यांच्या जबाबदारी आपण स्वीकारत आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने बंजारा समाजाला 15 वर्ष सत्तेत महत्वाचे स्थान दिले. आज मात्र सरकारमध्ये केवळ अधिकार नसलेले राज्यमंत्री पद समाजाला मिळाले आहे. परळीच्या विकासात पालकमंत्र्यांनी खिळ घातल्याने आपण आपला विकास निधी बंजारा समाजाच्या आ.प्रदिप नाईक यांच्या मतदार संघात खर्च केला. बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी सभागृहात नेहमीच आवाज उठवण्याचे काम केले असून, या पुढेही समाजाच्या प्रत्येक लढ्यात खांद्याला खांदा लावुन काम करण्याचे आपण सेवालाल महाराजांना स्मरून जाहीर करत असल्याचे मुंडे म्हणाले.
ऊसतोड कामगार म्हणुन बंजारा समाजावर लागलेला शिक्का पुसून टाकायचा आहे. आपल्याला सेवेची संधी दिल्यास 5 वर्षात पुढील 5 पिढ्या नाव घेतील असा विकास करून दाखविण्याचे वचन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अरूण पवार, प्रास्ताविक डी.एस.राठोड सर तर विनायक राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास मतदार संघातील बंजारा समाज बांधवांची प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थिती होती.