गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज
अंबाजोगाई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डिजे बंदीचे काटेकोर पालन करण्यात येणार असून विसर्जन मिरवणुकीत डिजेचा दणदणाट घुमल्यास संबंधितांवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशीनतंर गुन्हे नोंदवून कडक कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला. तरूणाईने अल्पकाळाच्या आनंदासाठी डिजे बंदीचे उल्लंघन करून स्वत:चे भवितव्य अंध:कारमय करू नये असे आवाहनही त्यांनी केले. अंबाजोगाई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आगामी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई उपविभागात पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते म्हणाले की, या उपविभागातील अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ४०३ गणेश मंडळे आहेत. गणेशोत्सवाच्या आधीच पोलिसांच्या वतीने शांतता समितीच्या एकूण ५४ बैठका घेऊन सणोत्सवाच्या काळात शांतता पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी ६८९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून एकाच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर, मागील २० दिवसात दारू आणि जुगार अड्यांवर एकूण ४५ धाडी टाकण्यात आल्या आहेत. विसर्जनाच्या दिवशीही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. विशेषत: अन्य धर्मीयांच्या प्रार्थना स्थळाबाहेर बॅरीकेट्स आणि पोलिसांचे संरक्षक कडे असणार आहे. हुल्लडबाजी, धिंगाणा, गोंधळ घालणारांवर कडक कारवाई करण्यात येईल. या काळात कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरीकांनी निर्भय वातावरणात आनंदाने आणि शांततेत विसर्जनात भाग घ्यावा असे आवाहन पोद्दार यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत अपर अधीक्षक स्वाती भोर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनीही बंदोबस्ताची माहिती दिली. दरम्यान, पोद्दार यांनी अंबाजोगाई आणि परळी शहरातील विसर्जन मिरवणुकांच्या मार्गाची पाहणी केली.
जीवरक्षक जवानांची नियुक्ती
विसर्जनाच्या वेळी घडणारे अपघात रोखण्यासाठी अंबाजोगाई आणि परळी शहरातील विसर्जनस्थळी जीवरक्षक जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, विसर्जनस्थळी पुरेसा प्रकाश असावा यासाठी प्रखर विद्युत झोत लावण्यात येणार आहेत.
दारूविक्रेत्यांना इशारा
विसर्जनाच्या दिवशी जर कोणी लपूनछपून मद्याची विक्री करताना आढळून आले तर त्यांच्यावर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात येईल असा इशारा पोद्दार यांनी दिला.
परवाना नसलेल्या गणेश मंडळांवर होणार कारवाई
उपविभागातील बहुतांशी गणेश मंडळांनी पोलिसांकडून परवाना घेतला आहे. ज्या मंडळांनी अद्याप परवाना घेतला नाही त्यांनी लवकर घ्यावा अन्यथा विसर्जनानंतर अशा मंडळांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोद्दार यांनी सांगितले.