अंबाजोगाई : स्वतःचा घर प्रपंच सांभाळून लहान बालकांना मायेचा ओलावा देणा-या अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या कष्टाची मला जाणीव आहे, त्यामुळे त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना विमा संरक्षण लागू करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजा मुंडे यांनी येथे सांगितले. दरम्यान, झालेल्या कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांनी ना. पंकजाताई मुंडे यांना ‘राखी’ बांधून त्यांच्याशी आपले नाते अधिक दृढ केले.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस संघटनेच्या वतीने शहरातील साधना मंगल कार्यालयात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांचा सेविका व मदतनिसांच्या मानधनात भरीव वाढ केल्याबद्दल जाहीर ऋणनिर्देश सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून आ. आर.टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, महिला आयोगाच्या सदस्या गयाताई कराड, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा जयश्री मुंडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, राज्यातील कुपोषण निर्मूलनात अंगणवाडी सेविकांचे महत्वाचे योगदान आहे. स्वतःचा प्रपंच सांभाळून या महिला इतरांच्या मुलांचेही पालन पोषण करतात, त्यामुळे त्या यशोदेचे रूप आहेत. त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी महिला बालविकास मंत्री म्हणून पहिल्यांदा सुत्रं हाती घेताच त्यांना मानधन वाढ केली. सुरवातीला पांच हजार असणारे मानधन आता ८ हजारापर्यंत वाढवले आहे, शिवाय त्यांना मोबाईल पण दिला आहे, त्यांचे कष्ट पाहता त्यांना विमा धोरण लागू करण्यासंदर्भात आमचा विचार चालू आहे,तसेच अनेक जणींकडे आधार कार्ड नाही, त्यामुळे प्रत्येकींना आधार कार्ड देण्यासाठी अधिका-यांनी पुढाकार गांभिर्याने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अंगणवाडी कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करत होते, गेल्या वीस वर्षात जेवढी वाढ अंगणवाडी कर्मचार्यांना झाली नाही, त्यापेक्षा जास्त वाढ मी दिली. पेन्शन व शासकीय कर्मचार्यांचा दर्जा मिळून देण्यासाठी प्रयत्न करू. मला तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवायच्या आहेत. आपले प्रश्न हक्काने मला सांगा असे आवाहनही यावेळी ना. मुंडे यांनी केले.
पोषण अभियान यशस्वी करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार अंगणवाडी सेविकांनी पोषण अभियानात सहभाग घ्यावा व ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले. तुम्ही मला खूप प्रेम दिले, लोकनेते मुंडे साहेबांचे संस्कार असल्याने तुमच्या प्रत्येक लढ्यात मी तुमच्या सोबत आहे असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले.
अंगणवाडी सेविकांचा प्रेमाचा धागा
राज्यभरातून आलेल्या अंगणवाडी सेविकांनी यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांना राखी बांधली. ही राखी तुमच्या-माझ्यातील प्रेमाचा धागा आहे, आपले नाते अतूट आहे अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. आता मी तुमची रक्षणकर्ती आहे, तुम्हाला देखील लहान मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी पार पाडायची आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी अंगणवाडी सेविकांनी एकाच वेळी हात उंचावून त्यांना मिळालेल्या मोबाईलची टॉर्च ऑन केली व स्वागत केले.
अंगणवाडी कर्मचार्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न पंकजाताईंनी सोडविल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. ऋण निर्देश सोहळ्यासाठी न भुतो न भविष्यती एवढ्या मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी ताईंच्या स्वागतासाठी उपस्थित राहिल्या होत्या. सभागृहात जागा कमी पडल्याने पाठिमागे लावलेल्या स्क्रीनसमोर बसून ताईंचे भाषण अंगणवाडी कर्मचार्यांनी ऐकले.