अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूक : उपनगराध्यक्षपद भूषविलेल्यांचा होतोयं पराभव, शहरात रंगली चर्चा, वाचा…!

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेची निवडणूक पार पडून अवघे काहीच दिवस झाले असले तरी निकालांवरून शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काहींना अपेक्षित यश मिळाले, तर अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला. मात्र, या निवडणुकीत एक वेगळाच मुद्दा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे, तो म्हणजे उपनगराध्यक्षपद भूषविलेल्यांचा पराभव.

अंबाजोगाई नगरपरिषदेच्या राजकीय इतिहासावर नजर टाकली असता, उपनगराध्यक्षपद भूषविलेल्या बहुतांश नगरसेवकांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याचे चित्र समोर येते. यंदाच्या निवडणुकीतही हा ‘पॅटर्न’ पुन्हा एकदा दिसून आला आहे.

माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, सारंग पुजारी, मनोज लखेरा, बबन‌ लोमटे, सविता लोमटे, दिलीप सांगळे, डी. के. कांबळे, लंकेश वेडे, शेख नबी, हकीम भाई, शेख रहीम, कटालू शेख यांच्यासह अनेक माजी उपनगराध्यक्षांना मतदारांनी नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. हे सर्वजण शहराच्या राजकारणात प्रभावी मानले जात असतानाही त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

यामुळे अंबाजोगाईत आता एकच प्रश्न चर्चेत आहे. हा निव्वळ योगायोग आहे की अजून ‌काय ? काही राजकीय जाणकार हे बदलत्या मतदार मानसिकतेचे लक्षण मानत आहेत. कारण काहीही असो, मात्र उपनगराध्यक्षपद भूषविलेल्यांचा पराभव ही बाब अंबाजोगाईच्या राजकारणात पुन्हा एकदा चवीने चर्चिली जात आहे.