दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. दि. 27 डिसेंबर 2025 रोजी प्रतीक्षा रोडे या महिलेची प्रसूती झाल्यानंतर काही वेळातच तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात संबंधित गायनिक विभागातील तसेच 27 डिसेंबर रोजी ऑन ड्युटी असलेल्या डॉक्टरांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी जातीअंत संघर्ष समितीचे निमंत्रक कॉम्रेड बब्रुवान पोटभरे आणि बहुजन विकास मोर्चाचे विनोद शिंदे यांनी केली आहे.
या मागण्यांसंदर्भात दि. 30 डिसेंबर रोजी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रोडे कुटुंबीयही उपस्थित होते. दोन दिवसांत संबंधितांवर योग्य व कठोर कारवाई न झाल्यास शुक्रवार दि. 2 जानेवारी रोजी ‘स्वाराती’ रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या निवेदनावर कॉम्रेड बब्रुवान पोटभरे आणि बहुजन विकास मोर्चाचे विनोद शिंदे, बाबा शेख, अविनाश कुऱ्हाडे, शेख बब्बू, रवि आवाडे, शफीक शेख यांच्यासह आदींच्या सहृया आहेत.



