टीम AM : वर्गखोलीत नाही, कोचिंग सेंटरमध्ये नाही, तर मोकळ्या आकाशाखाली, शेळ्या आणि धुळीत शिक्षण घेतलेल्या कोल्हापूरच्या बिरदेव सिद्धप्पा यांनी ‘युपीएससी’ परीक्षेत AIR 551 क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. एकेकाळी साधा मेंढपाळ असलेला बिरदेव आज देशातील सर्वोच्च प्रशासकीय सेवेकडे वाटचाल करत आहे.
बिरदेवचं आयुष्य संघर्षांनी भरलेलं होतं. पक्कं घर नाही, अभ्यासासाठी स्वतंत्र जागा नाही, कधी शाळेच्या व्हरांड्यात, तर कधी मोकळ्या आकाशाखाली बसून त्याने अभ्यास केला. प्रतिकूल परिस्थितीतही त्याने कधी हार मानली नाही. ही कहाणी त्याच्या अपार मेहनतीची, चिकाटीची आणि आत्मविश्वासाची साक्ष देणारी आहे.
बिरदेवच्या वडिलांना ‘युपीएससी’ परीक्षेबाबत फारशी माहिती नव्हती. मात्र, आपल्या मुलामध्ये काहीतरी वेगळं करण्याची क्षमता आहे, हा विश्वास त्यांनी कायम ठेवला. छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास डोंगरदऱ्या, अडथळे आणि अडचणी पार करत आज सत्तेच्या कॉरिडॉरपर्यंत पोहोचला आहे.
बिरदेवची यशकथा एक महत्त्वाचा संदेश देते – निर्धार ठाम असेल आणि मेहनत प्रामाणिक असेल, तर कोणताही कठीण मार्ग अडथळा ठरत नाही. अडचणींनी वेढलेलं आयुष्य असूनही स्वप्नं पूर्ण करण्याचं धैर्य बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी ही कहाणी प्रेरणादायी ठरत आहे.
‘युपीएससी’ सारख्या अत्यंत कठीण परीक्षेत यश मिळवून बिरदेव सिद्धप्पा यांनी सिद्ध केलं आहे की, मेहनत खरी असेल तर ध्येय नक्कीच गाठता येतं. मार्ग कितीही कठीण असला तरी. बिरदेव सिद्धप्पा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…!



