टीम AM : राजकारण म्हटलं की अनेक सुशिक्षित लोक जाणीवपूर्वक लांब राहतात. मात्र, राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा घडावी, नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत, या उद्देशाने उच्चशिक्षित रचना परदेशी ही अंबाजोगाई परिवर्तन जनविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक मैदानात उतरली. प्रभाग क्रमांक 10 मधील जनतेने तिच्यावर विश्वास टाकत तिची नगरसेविका म्हणून निवड केली. निवडीनंतर अवघ्या काही दिवसांतच आपल्या पदाबाबत असलेली जागरूकता रचना परदेशी हिने दाखवून दिली आहे.
प्रभागातील नागरिकांनी दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी नगरपरिषदेचे कामकाज, विविध विभागांची कार्यपद्धती याची सखोल माहिती असणे आवश्यक असल्याचे मानत तिने थेट कृतीला सुरुवात केली आहे.
अंबाजोगाई नगरपरिषदेच्या कामकाजाची आज रचना परदेशी हिने माहिती घेतली. यावेळी तिने बांधकाम विभाग, आवास योजना, ‘पीटीआर’ विभाग आदी विभागांना भेटी देत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. नगरपरिषदेची निवडणूक होऊन अद्याप मोजकेच दिवस झाले असून, पहिली सर्वसाधारण बैठकही झालेली नाही. असे असतानाही पदाविषयीची निष्ठा आणि जनतेच्या सेवेसाठीची जिद्द यामुळे नवनिर्वाचित नगरसेविका रचना परदेशी हिने कामाला सुरुवात केली आहे.
जनसेवेसाठी सदैव तत्पर असलेली रचना परदेशी हिच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांची कामे मार्गी लागतील आणि विकासाच्या बाबतीत प्रभागाचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे.



