अंबाजोगाईत बॅनर्सना मोकळीक, मग सर्वसामान्यांना सूट कधी ?, नागरिकांचा सवाल, वाचा…!

टीम AM : अंबाजोगाई शहरात सध्या चौकाचौकात, मुख्य रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी शेकडो बॅनर्स झळकत असून, या बॅनर्ससाठी नगरपरिषदेला नियमानुसार कर भरला आहे का ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे हे बहुतांश बॅनर्स नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या समर्थकांचे असल्याचे दिसून येत असल्याने, त्यांना नियमांमध्ये सूट दिली जात आहे का ? याबाबत शहरात चर्चा रंगू लागली आहे.

नगरपरिषदेच्या नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या बॅनर्ससाठी शुल्क आकारले जाते. मात्र, सध्या मोठ्या प्रमाणावर लावलेल्या बॅनर्सबाबत नगरपरिषदेकडून ठोस कारवाई किंवा कर वसुली होताना दिसत नसल्याने, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर काहींना नियमांमध्ये शिथिलता दिली जात असेल, तर अशीच सवलत सर्वसामान्य नागरिकांनाही मिळावी, अशी अपेक्षा आता उघडपणे व्यक्त होत आहे.

अंबाजोगाई शहरातील उपेक्षित व वंचित वस्त्यांमध्ये राहणाऱ्या अनेक मागासवर्गीय बांधवांवर घरपट्टी आणि नळपट्टीची मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. या थकीत रकमेमुळे शासनाच्या महत्त्वाकांक्षी रमाई घरकुल आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले फॉर्म भरतानाच अनेक अडचणी येत आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना, थकीत कर भरल्याशिवाय कागदपत्रे पूर्ण होत नसल्याने अनेक कुटुंबे या योजनेपासून वंचित राहत आहेत. जर नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी बॅनर्स लावणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणेच या गरजू आणि मागासवर्गीय बांधवांना घरपट्टी व नळपट्टीत सूट, सवलत जाहीर केली, तर रमाई आवास योजनेची अंमलबजावणी अधिक व्यापक आणि प्रभावी होऊ शकते, असा नागरिकांचा विश्वास आहे. यामुळे खऱ्या अर्थाने वंचित घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा हे पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर या बाबत कोणती भूमिका घेतात ? नियम सर्वांसाठी समान ठेवतात की सर्वसामान्यांच्या अडचणी लक्षात घेऊन दिलासा देतात, याकडे आता संपूर्ण अंबाजोगाई शहराचे लक्ष लागले आहे.