नगर‌परिषदेचे प्रभाग 13 व 14 मधील नगरसेवक ॲक्शन मोडवर : सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी कारखाना फिल्टर हाऊसची पाहणी…!

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेची निवडणूक पार पडून अवघे काही दिवस उलटले असतानाच प्रभाग क्रमांक 13 आणि 14 चे लोकविकास महाआघाडीचे नगरसेवक राजपाल जावळे, अकबर पठाण आणि मुन्ना पठाण ॲक्शन मोडवर आले आहेत. या प्रभागातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा मिळावा, यासाठी नगरसेवकांनी थेट कारखाना फिल्टर हाऊसला भेट देत तेथील कामकाजाची सविस्तर माहिती घेतली आणि प्रत्यक्ष पाहणी केली.

अंबाजोगाईतील प्रभाग क्रमांक 13 आणि 14 मधील नागरिकांना गेल्या ‌कांही दिवसांपासून नियमित व सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यासोबतच या प्रभागात कमी दाबाने‌ पाणीपुरवठा होतो. याचीच दखल घेत प्रभागातील नागरिकांना पाणीपुरवठ्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी आवश्यक त्या सूचना तिन्ही नगरसेवकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

विशेष म्हणजे नगरपरिषदेची अजून पहिली सर्वसाधारण बैठकही झालेली नाही किंवा रितसर प्रक्रिया पूर्ण झालेली नसतानाही, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतलेला दिसत आहे. त्यामुळे या पुढील ‌काळात या दोन्ही प्रभागात सुरळीत आणि शुध्द पाणी पुरवठा होईल आणि पाणीपुरवठ्यातील अडथळे ‌दूर होतील, अशी अपेक्षा या भागातील नागरिक करीत आहेत. 

विद्यमान नगरसेवकांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे प्रभाग 13 व 14 मधील नागरिकांकडून या कार्याचे कौतुक होत आहे. नागरिकांच्या सेवेसाठी दाखवलेली हीच तत्परता पुढील पाच वर्षे कायम राहावी, अशी अपेक्षा प्रभागातील नागरिक व्यक्त करत आहेत.