टीम AM : ‘स्वाराती’ रुग्णालय ‘सुपर स्पेशालिटी’ होणार असल्याचा गवगवा लोकप्रतिनिधींकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात रुग्णालयातील मूलभूत समस्या मात्र संपायच्या नाव घेत नाहीत. गेल्या आठ दिवसांपासून अतिदक्षता विभागाची (ICU) लिफ्ट बंद असल्याने गंभीर रुग्णांना अक्षरशः कापडी झोळी करून पायऱ्यांवरून वर – खाली नेण्याची वेळ आली आहे. या अमानवीय दुर्लक्षामुळे रुग्णांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
‘स्वाराती’ च्या अतिदक्षता विभागाच्या इमारतीत दोन लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत. मात्र, लिफ्ट बसवल्यापासूनच त्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप होत असून वर्षातील अनेक दिवस या लिफ्ट बंदच असतात. याच इमारतीत अतिदक्षता विभागासह मेडिसिन वॉर्ड आणि बालरुग्ण कक्ष आहेत. येथे उपचार घेणारे बहुतांश रुग्ण वृद्ध किंवा लहान बालके असल्याने लिफ्ट सेवा अत्यावश्यक आहे.
एखाद्या रुग्णाला ‘एक्स – रे’, ‘सीटी स्कॅन’, ‘एमआरआय’ किंवा रक्त तपासणीसाठी दुसऱ्या इमारतीत नेणे आवश्यक असल्यास लिफ्टशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. लिफ्ट बंद असल्याने नातेवाईकांना तीन – चार जणांची मदत घेऊन रुग्णाला झोळीत टाकून पायऱ्यांवरून उतरावे लागते. या धोकादायक प्रवासात रुग्णाची प्रकृती अधिक बिघडण्याची भीती कायम असते.
दरम्यान, अंबाजोगाईतील आमदार व इतर लोकप्रतिनिधी नगरपरिषदेच्या निवडणूक प्रवाहातून बाहेर पडत नसून, रुग्णांच्या गंभीर प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने गांभीर्याने लक्ष देऊन लिफ्ट दुरुस्तीसह कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून जोर धरू लागली आहे.



