टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली असून भाजपप्रणित अंबाजोगाई परिवर्तन जनविकास आघाडीचे नंदकिशोर मुंदडा यांनी लोकविकास महाआघाडीचे प्रमुख राजकिशोर मोदी यांचा पराभव करत नगराध्यक्षपद पटकावले आहे. लवकरच नंदकिशोर मुंदडा नगराध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, नगरपरिषदेची सर्वसाधारण बैठकही येत्या काळात पार पडणार असून या बैठकीत उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. नियमानुसार लोकविकास महाआघाडीच्या वाट्याला दोन, तर अंबाजोगाई परिवर्तन जनविकास आघाडीच्या वाट्याला एक स्वीकृत सदस्य मिळणार आहे.
नगरपरिषदेत लोकविकास महाआघाडीचे स्पष्ट बहुमत असल्याने उपनगराध्यक्षपद त्यांच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. लोकविकास महाआघाडीचे नेतृत्व राजकिशोर मोदी करत असल्याने उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि स्वीकृत सदस्य म्हणून कोणाला संधी दिली जाणार, याकडे अंबाजोगाईकरांचे लक्ष लागले आहे. आगामी बैठकीत होणाऱ्या निर्णयांकडे सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले आहे.
उपनगराध्यक्षांच्या माध्यमातून राजकिशोर मोदींचा नगरपरिषदेवर अंकुश ?
अंबाजोगाई नगरपरिषदेत लोकविकास महाआघाडीचे स्पष्ट बहुमत असून उपनगराध्यक्षपदही त्यांच्याच वाट्याला जाण्याची शक्यता आहे. लोकविकास महाआघाडीचे प्रमुख राजकिशोर मोदी हे उपनगराध्यक्षांच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या कारभारावर प्रभावी अंकुश ठेवण्याची रणनीती आखत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे आगामी सर्वसाधारण बैठकीत उपनगराध्यक्षपदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



