टीम AM : कोरेगाव भीमा येथे 208 व्या शौर्यदिनानिमित्त ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी हाती निळे झेंडे व मुखी ‘जय भीम’ ची गर्जना करीत लाखों भीम अनुयायांचा जनसागर उसळला. उत्साहपूर्ण वातावरणाने संपूर्ण विजयस्तंभ परिसर व अहिल्यानगर रस्ता गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत अभिवादनासाठी अखंड रांगा लागल्या होत्या.
मध्यरात्रीपासूनच सोहळ्याला सुरुवात
31 डिसेंबरच्या मध्यरात्री रोषणाई, आतषबाजी व सामुदायिक बुद्धवंदनेने शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. पहाटेपर्यंत धम्मदेशना, धम्मपठण सुरू होते. सकाळी प्रशासन, महार रेजिमेंट व समता सैनिक दलाकडून सलामी देऊन औपचारिक अभिवादनास सुरुवात झाली. थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध असतानाही प्रत्यक्ष अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांची गर्दी दिवसभर वाढतच गेली. मध्यरात्री दुचाकी रॅलीमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली; दुपारनंतर पुन्हा गर्दी प्रचंड वाढली, ती सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती.
मान्यवरांचे अभिवादन
दिवसभर विविध पक्ष, संघटना, सामाजिक संस्था तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी विजयस्तंभास मानवंदना दिली. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर, सचिन खरात, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याह अनेक नेत्यांनी मानवंदना दिली.
विजयस्तंभाला आकर्षक सजावट
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या धर्तीवर ऐतिहासिक विजयस्तंभास कृत्रिम व नैसर्गिक अशा दोन लाख फुलांची सजावट करण्यात आली होती. अशोकचक्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.



