टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेच्या घरपट्टी व नळपट्टीसह इतर कारभार मार्च – 2026 पासून ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयामुळे नागरिकांना करभरणा व इतर सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणाऱ्या ठरणार आहेत.
दरम्यान, नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी पदभार घेण्यापूर्वीच मागासवर्गीय जनतेसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. रमाई आवास योजनेसाठी नळपट्टी व घरपट्टी पूर्णपणे माफ करण्यात येऊ नये, मात्र, या संदर्भातील अट शिथील करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रमाई आवास योजनेचा अर्ज भरताना सध्या घरपट्टी व नळपट्टीची थकबाकी अडथळा ठरत असून, त्यामुळे उपेक्षित व वंचित मागासवर्गीय बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे थकबाकी भरू न शकणाऱ्या लाभार्थ्यांचे अर्ज अपूर्ण राहतात किंवा नाकारले जातात, अशी परिस्थिती आहे. ही अट शिथील झाल्यास मोठ्या संख्येने मागासवर्गीय बांधवांना रमाई आवास योजनेचा अर्ज भरता येईल आणि या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल. त्यामुळे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने नगरपरिषदेने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा मागासवर्गीय बांधवांकडून व्यक्त होत आहे.



