‘स्वाराती’ च्या ‘त्या’‌ घटनेविरोधात अधिष्ठातांना निवेदन : कारवाईची मागणी, वाचा…!

टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे दि. 27 डिसेंबर 2025 रोजी नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. प्रतिक्षा रोडे यांच्या प्रसूतीपूर्व सर्व वैद्यकीय तपासण्या नॉर्मल असतानाही प्रसूतीदरम्यान आवश्यक ती तत्परता व उपचार न दिल्याचा आरोप नातेवाईक व सामाजिक संघटनांकडून करण्यात आला आहे.

या घटनेनंतर जातीअंत संघर्ष समितीचे निमंत्रक कॉम्रेड बब्रुवान पोटभरे आणि बहुजन विकास मोर्चाचे विनोद शिंदे यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात गायनिक विभाग प्रमुख तसेच दि. 27 डिसेंबर रोजी ड्युटीवर असलेल्या संबंधित डॉक्टरांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी निवेदन देताना अविनाश कुऱ्हाडे, रवी, बाबा शेख, बब्बू शेख, प्रेम माने, मनीष आदमाने, युसूफ शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.