टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार सोमवारी नंदकिशोर मुंदडा घेणार आहेत. या पदभार सोहळ्यासाठी भाजप समर्थकांनी जय्यत तयारी सुरु केली असून नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत ठिकठिकाणी विजयी झालेल्या नगरसेवकांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात स्वागताच्या तयारीसाठी कमिट्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. एकंदरीत भाजप समर्थक या पदभार सोहळ्याला ‘ग्रॅन्ड इव्हेंट’ बनवणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
अंबाजोगाई नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली असून अंबाजोगाईकरांनी नगराध्यक्षपदाचा कौल नंदकिशोर मुंदडांच्या पारड्यात टाकला आहे. त्यामुळे मुंदडांच्या कार्यकर्त्यांत मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. पदभार स्वीकारण्याअगोदर नगराध्यक्षांच्या दालनाची रंगरंगोटी आणि लिफ्टचीही सेवा सुरु करण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन समर्थक पदभार स्वीकारण्याची जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत.
दरम्यान, नगरपरिषदेची सर्वसाधारण बैठकही येत्या काळात पार पडणार असून या बैठकीत उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. नियमानुसार लोकविकास महाआघाडीच्या वाट्याला दोन, तर अंबाजोगाई परिवर्तन जनविकास आघाडीच्या वाट्याला एक स्वीकृत सदस्य मिळणार आहे. नगरपरिषदेत लोकविकास महाआघाडीचे स्पष्ट बहुमत असल्याने उपनगराध्यक्षपद त्यांच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. लोकविकास महाआघाडीचे नेतृत्व राजकिशोर मोदी करत असल्याने उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि स्वीकृत सदस्य म्हणून कोणाला संधी दिली जाणार, याकडे अंबाजोगाईकरांचे लक्ष लागले आहे. आगामी बैठकीत होणाऱ्या निर्णयांकडे सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या पदभाराची जशी चर्चा अंबाजोगाईत सुरु आहे, तशीच चर्चा उपनगराध्यक्ष पदाच्या बाबतीत सुरु आहे. उपनगराध्यक्षपदी लोकविकास महाआघाडीचाचं नगरसेवक विराजमान होईल आणि नगरपरिषदेच्या सत्तेची दुसरी चावी आपल्याकडेचं राहिल याची दक्षता आघाडीचे प्रमुख नेते घेत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.
स्वीकृत सदस्यांत मोदी, लोमटे आघाडीवर : नगरपरिषदेत सत्तासंघर्ष
लोकविकास महाआघाडीला नगरपरिषदेत स्पष्ट बहुमत प्राप्त झाल्याने त्यांना दोन स्वीकृत नगरसेवक मिळणार आहेत. या स्वीकृत सदस्यांच्या निवडीत माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी आणि माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही नेते अनुभवी आणि प्रभावी असल्याने त्यांच्या निवडीमुळे नगरपरिषदेत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीमुळे महाआघाडीची ताकद अधिक वाढणार असून, सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे येत्या काळात नगरपरिषदेत निर्णयप्रक्रिया, सत्ता संतुलन आणि राजकीय संघर्ष अधिक तीव्र स्वरूपात पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



