टीमAM : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड शहरात भव्य तारांगण व अत्याधुनिक विज्ञान केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आज शुक्रवार दि. 3 जानेवारी रोजी सुमारे 28 कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
या तारांगणाच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांना ग्रह, तारे, उल्का, धूमकेतू, इंटर – गॅलेटीक ऑब्जेक्ट, आकाशगंगा आदी खगोलशास्त्रीय घटकांची माहिती अत्याधुनिक यंत्रणांच्या सहाय्याने आणि मातृभाषेत दिली जाणार आहे. त्यामुळे विज्ञान विषयक ज्ञानात भर पडून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मोठी मदत होणार आहे.
यासोबतच उभारण्यात येणाऱ्या विज्ञान केंद्रामध्ये चार माहिती केंद्रे, मध्यभागी तारांगण व विज्ञान उद्यान असणार आहे. ही माहिती केंद्रे AI आणि आभासी तंत्रज्ञानावर आधारित खेळ, मानव वंशाचा इतिहास, प्रकृतीशास्त्र तसेच पर्यावरण या विभागांमध्ये कार्यरत असतील.
या प्रकल्पासाठी बीड शहरातील धानोरा रस्त्यावरील ‘पंढरी’ येथील जागा प्रशासनाने निश्चित केली आहे. बीड शहराच्या वैभवात भर घालणारा हा प्रकल्प भविष्यात विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण करून वैज्ञानिक जाणीव जागृत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.



