नगराध्यक्षांच्या पदभार सोहळ्याचा जल्लोष : स्वच्छता कामगार मात्र थकित वेतनाच्या प्रतीक्षेत, वाचा…!

चार महिन्यांपासून वेतन थकल्याने अंबाजोगाईतील स्वच्छता यंत्रणा कोलमडली

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा हे उद्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप समर्थकांकडून पदभार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून शहरात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असले तरी दुसरीकडे स्वच्छता कामगार मात्र, नगराध्यक्षांच्या पदभाराकडे आशेने पाहत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून स्वच्छता कामगारांचे वेतन थकले असून त्यामुळे अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

नियमित काम करूनही वेतन मिळत नसल्याने काही कामगारांनी कामावर जाणे बंद केले आहे. याचा थेट परिणाम शहराच्या स्वच्छतेवर झाला असून अंबाजोगाईतील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. शहरातील प्रत्येक प्रभाग व वॉर्डात स्वच्छतेअभावी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. बहुतांश ठिकाणी घंटागाड्या बंद असल्याने नागरिकांना घराघरात कचरा साठवून ठेवावा लागत आहे. साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष उद्या पदभार स्वीकारल्यानंतर थकीत वेतन अदा करतील, अशी अपेक्षा स्वच्छता कामगारांनी व्यक्त केली आहे.

कामगारांचे वेतन मिळाल्यास शहरातील कोलमडलेली स्वच्छता यंत्रणा पुन्हा पूर्ववत होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडूनही व्यक्त होत आहे. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा पदभार घेतल्यानंतर या गंभीर प्रश्नावर कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण अंबाजोगाईकरांचे लक्ष लागले आहे.