शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन मुडेगावकर यांची मागणी
अंबाजोगाई : अद्याप समाधानकारक पाऊस पडला नसल्यामुळे गणपती विसर्जन कुठे करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तेव्हा आगामी गणेशोत्सवाच्या दृष्टीने नगर परिषदेने विसर्जन तलाव आपल्या दारी व कृत्रिम तलाव उपक्रम राबवावा अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुखगजानन मुडेगावकर यांनी केली आहे. अर्धा पावसाळा संपत आला असला तरी पावूसच झाला नसल्यामुळे गणेशमुर्ती विसर्जनाचे पारंपरिक स्त्रोत पाण्याअभावी कोरडेठक्क पडले असून गणेशमुर्तींचे विसर्जन कोठे करावे हा मोठा प्रश्न गणेशभक्तांसमोर निर्माण झाला आहे.
अंबाजोगाई शहरातील जवळपास चाळीस हजार घरात आणि सत्तर ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी प्रतिवर्षी गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना होत असते,गल्लीतील प्रत्येक घरातील गणपती मुर्ती गणेश मंडळांच्या ठिकाणी दिली जाते मात्र पाणी नसल्यामुळे विटंबना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण गणेशोत्सवाच्या काळात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या या गणेशमुर्ती पारंपरिक प्रथेप्रमाणे मोरेवाडी येथील तलाव, बडाहनुमान मंदीराजवळील तलाव, दासोपंत परीसरातील नृसिंह तीर्थ, बोरुळा तलाव आणि परीसरातील लहान-मोठ्या विहिरीमध्ये विधीवत करण्यात येत होते. मात्र यावर्षी पाऊसच नसल्यामुळे गणेशमुर्ती विसर्जनाची ही स्त्रोत पाण्याअभावी कोरडीठक्क पडली आहेत. तेंव्हा गणेशमुर्तींचे विधीवत विसर्जन करण्यासाठी पोलीस-महसुल आणि नगर परीषद प्रशासनाने पुढाकार घेवून पुणे कल्याण डोंबिवली प्रमाणे विसर्जन तलावआपल्या दारी उपक्रम राबवावा व पालिकेने पाण्याने भरलेला मोठा कृत्रिम हौद गणेशमुर्ती विसर्जनासाठी उपलब्ध करुन दयावा व गणेशमुर्ती विसर्जनाच्या पावित्र्य प्रथेला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.
शहरात मोहरम व गणेशोत्सव हे दोन्ही उत्सव अंबाजोगाई शहराच्या परंपरेला साजतील अशा शांततेच्या वातावरणात शिस्तबद्ध पध्दतीनेच साजरे केले जातात त्यामुळे गणेशभक्तांच्या भावना लक्षात घेऊन कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख गजानन मुडेगावकर यांनी केली आहे.