सुदर्शन रापतवार
महाराष्ट्राच्या १६ व्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याच्या उंबरठ्यावर आज आपण सर्वजण उभे आहोत. १५ विधानसभा निवडणुकीचा बिगुल २० सप्टेंबर २०१४ रोजी वाजला असल्यामुळे आता या १६ व्या विधानसभेसाठीचा बिगुल १२ सप्टेंबर नंतर गणेश विसर्जनाचे ढोलताशे बंद झाले की केंव्हाही वाजू शकतो अशी चिन्ह आहेत. राजकीय निरीक्षक ही १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान बिगुल वाजून आदर्श अचार संहीतेची अंमलबजावणी सुरु होईल असे अंदाज वर्तवत आहेत.
१६ व्या विधानसभा निवडणुकीचीही लगबग राज्यात सर्वत्र सुरु झाली आहे, मग केज मतदार संघात ही लगबग चालू न झाली तर नवलच! ही लगबग सुरु असतांनाच नवीन आमदार निवडण्यापुर्वी केज विधानसभा मतदार संघाचा थोडा भौगोलिक अभ्यास आपण करु या.
२००९ साली १३ विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापुर्वी राज्यातील विधानसभा मतदार संघाची पुर्नरचना करण्यात येवून बहुतांश मतदार संघाच्या भौगोलिक कक्षांमध्ये बदल करण्यात आली. राज्यातील सर्वच मतदार संघातील अनेक गावांची मोडतोड करुन ते इतर मतदार संघात जोडण्यात आले आणि कांही नवीन मतदार संघाची निर्मिती ही करण्यात आली. परळी मतदार संघाची निर्मिती याच काळात झाली. याच प्रक्रियेत पुर्वीच्या केज विधानसभा मतदार संघाच्या भौगोलिक क्षेत्रात फारमोठे बदल करण्यात येवून अंबाजोगाई तालुक्याच्या एका टोकापासून सुरु झालेला हा मतदार संघ अंबाजोगाई, केज, चौसाळा तालुक्याच्या सीमा ओलांडत चक्क बीड तालुक्या पर्यंत नेवून ठेवला, आणि या मतदार संघात अनुसूचित मतदारांची संख्या अधिक आहे, अशी मतदारांची आकडेबेरीज करीत या मतदार संघावरील (अनुसूचित जमाती SC) प्रवर्गासाठी आरक्षण पुन्हा एकदा मतदार संघाच्या पुर्नरचना होईपर्यंत कायम ठेवले.
२००९ साली झालेल्या १३ व्या विधानसभा निवडणुकीपुर्वी केज विधानसभा मतदार संघाच्या पुर्नरचनेत केज विधानसभा मतदार संघातील धारुर तालुक्यातील १६ गावातील १५,३५० मतदारांचा समावेश माजलगाव विधानसभा मतदार संघात तर अंबाजोगाई तालुक्यातील २१ गावामधील २९,८३४ मतदारांचा समावेश नव्यानेच निर्माण झालेल्या परळी विधानसभा मतदार संघात करण्यात आला. म्हणजेच केज विधानसभा मतदारसंघातील ४५, १८५ मतदार माजलगाव आणि परळी मतदार संघात समाविष्ट करण्यात आले. तर दुसऱ्या बाजूला केज विधानसभा मतदारसंघात जुन्या चौसाळा मतदार संघातील नांदुरघाट, वीडा, येवता, चिंचोळीमाळी या जिल्हा परीषद मतदार संघातील ६१,३३९ तर बीड तालुक्यातील नेकनुर जिल्हा परिषद मतदार संघातील २५,३०९ असे एकूण ८६,६४८ नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला. या मतदार संघाच्या पुर्नरचनेनंतर केज विधानसभा मतदार संघाची एकुण मतदार संख्या २ लाख ८३ हजार ७५३ एवढी होती. यात केज तालुक्यातील १,५७,६३३ अंबाजोगाई तालुक्यातील १,००,८११ तर बीड तालुक्यातील २५,३०९ मतदारांचा समावेश होता.
केज विधानसभा मतदार संघात १९९० साली विद्दमान आमदार बी.एन. सातपुते यांचा ९.२२१ मतांनी पराभव करुन सतत या मतदारसंघात वाढत्या मतांनी विजयी होणाऱ्या तत्कालीन आमदार डॉ. सौ. विमल मुंदडा यांना या मतदार संघाच्या पुर्नरचनेनंतर २००९ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीतही मतदारांनी ४० हजारांचे विक्रमी मताधिक्य देत विजयी केले होते.
मतदार संघाच्या पुर्नरचनेच्यावेळी २ लाख ८३ हजार ७५३ एवढी मतदार संख्या आसलेल्या या मतदारसंघातील मतदार संख्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपुर्वी ३१ जानेवारी २०१९ च्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदान यादीनुसार आता ३ लाख ५५ हजार २७८ वर जावून पोहंचली आहे. यामध्ये १ लाख ८६ हजार ३१६ पुरुष मतदारांचा तर २ लाख ६८ हजार ९६२ स्त्री मतदारांचा समावेश आहे.
या नव्या भौगोलिक परिस्थितीत निर्माण करण्यात आलेल्या केज विधानसभा मतदार संघातुन निवडुण येण्यासाठी आता परळी आणि बीड तालुक्यात प्रभावी नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधी मदत घेणे आवश्यकच बनले आहे. कारण परळी आणि बीड तालुक्यातील ८६, ६४८ मतदारांवर याच लोकप्रतिनिधींचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. या नवीन राजकीय बदललेली समीकरणे, त्या त्या विभागातील नवे प्रश्न आणि बदलत्या राजकारणातील बदलते संदर्भ या सर्व पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणुक या मतदार संघातील नवीन राजकीय समिकरण निर्माण करेल असे वाटते.