एनआरसी, कॅब व सीएए कायदा परत घ्यावा – कॉ.बब्रुवाहन पोटभरे

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निदर्शने

अंबाजोगाई : केंद्र सरकारने आणलेला एनआरसी, कॅब व सीएए हा कायदा तात्काळ परत घ्यावा व या बाबत चाललेल्या आंदोलनावरील दडपशाही बंद करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी केली आहे. या संबंधी त्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत, फलक झळकावत निदर्शने केली. या संदर्भात उपजिल्हाधिकारी यांना शुक्रवार, दि.20 डिसेंबर रोजी निवेदन दिले आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधानाने भारतीय नागरिकत्वासाठी धर्म, भाषा, लिंग, जात व वंश यांना कधी आधार मानलेले नाही. बहुभाषिक व बहुधर्मिय, बहुजातीय भारतीय समाजात राज्य घटनेने देशातील माणसास एक नागरिक म्हणुन आधार मानले आहे. त्यानूसार विविध सांस्कृतिक समाज हे भारतीयत्व टिकून आहेत. सांप्रदायिक, जातीय, धर्मांध, फॅसिस्ट विचारसरणी माणणार्‍या भाजपच्या केंद्र सरकारने मुद्दामहून मुस्लिम, आदीवासी व इतर मागास प्रवर्गांना लक्ष करून वरील कायदे भेदभावा पोटी आणले आहेत. हा या देशाच्या संविधावर हल्ला आहे. परिणामी सजग विद्यार्थी,तरूण, भारतीय नागरिक याचा तिव्र विरोध करीत आहेत. त्या विरूद्ध मोदी सरकार आमानुष बळाचा वापर करीत असून त्यामुळे विद्यार्थी व तरूणांचे भवितव्य अंधकारमय करीत आहेत.

गोळीबार, अटक, लाठीमार याचा आम्ही धिक्कार करतो व सदरील कायदे तात्काळ परत घ्यावेत अशी मागणी करतो असे या निवेदनात म्हटले आहे. सदरील निवेदनावर कॉ. बब्रुवाहन पोटभरे, अनिल ओव्हाळ, छाया तरकसे, धिम्मंत राष्ट्रपाल, अक्षय भुंबे, नितीन सरवदे, लखन वैद्य, अस्मिता ओव्हाळ, पुनमसिंग टाक, वैशाली मस्के यांच्यासहीत इतरांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

बलात्कारी आरोपीस फाशी द्या : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

अंबाजोगाई शहरातील खोलेश्‍वर शाळेतील शिक्षक शाम वारकड याने विद्यार्थीनीवर आमानुष व माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करीत बलात्कार केला.त्या शिक्षकास कायद्याने कठोरात कठोर कारवाई करत फाशी द्यावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी केली आहे. या प्रश्नी त्यांनी उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई कार्यालयासमोर घोषणा देत फलक झळकावले. निदर्शने करून उपजिल्हाधिकारी यांना शुक्रवार, दि. 20 डिसेंबर रोजी निवेदन दिले आहे.