उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले विद्यार्थींनींनी निवेदन : शाळा – महाविदयालये बंद
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील भा.शि.प्र.च्या खोलेश्वर विद्यालयातील क्रीडा शिक्षक शाम वारकड याने त्याच शाळेतील अल्पवयीन विदयार्थिनीवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईकरांच्या वतीने आज दि. 20 डिसेंबर शुक्रवार रोजी महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात शाळा, महाविदयालये बंद ठेवून विदयार्थ्यांसह शिक्षक मोठया संख्येने सहभागी झाले. या मोर्चामुळे शहरातील प्रमुख रसत्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन निघुन उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यात अनेक मान्यवरांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, महिला पदाधिकाऱ्यांनी तीव्रतेने भावना व्यक्त केल्या. यावेळी मोर्चातील विद्यार्थींनींच्या हस्ते उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हणटले आहे की, आरोपी शाम वारकड विरुद्ध भादवि व बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार योग्य ती कारवाई करून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी. आरोपी विरुद्ध जलद गतीने तपास करून तात्काळ दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करावे व सदर प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये नियमित, दररोज चालवण्यात येऊन आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात येऊन पिडीतेस न्याय देण्यात यावा. आरोपीस कायम सेवामुक्त करण्यात यावे. कृत्य करणाऱ्या नराधमास पाठीशी घालणाऱ्या संस्थेचा कार्यवाह नितीन शेटे, मुख्याध्यापक व चालक यांना या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावे. पिडीत मुलगी व आरोपी जालना येथे शालेय क्रीडा स्पर्धेसाठी गेले असता शाळा व्यवस्थापनाने एखादी महिला शिक्षक सोबत का पाठवली नाही याची चौकशी करावी.
महाराष्ट्र शासनाने पिडीत मुलीच्या कुटुंबाच्या तात्काळ पुनर्वसनासाठी योग्य ती मदत करण्यात यावी. अंबाजोगाई शहरात शाळेसाठी ये-जा करणाऱ्या मुलींचे ऑटो रिक्षा बंद करून त्यांची स्कुल बसची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना सर्व शाळांना देण्यात यावी. अंबाजोगाई शहरातील खाजगी शिकवणी चालकांना शिकवणीसाठी ये-जा करणाऱ्या मुलींच्या संरक्षणा बाबतची योग्य ती काळजी घेण्याबाबत निर्देश देण्यात यावे. या मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. या महामोर्चात विद्यार्थी, शिक्षकांसह अंबाजोगाईकर मोठया संख्येने सहभागी झाले होते.