अंबाजोगाईत आद्यकवी मुकुंदराज काव्यसिंधूचे 22 डिसेंबरला आयोजन

महाराष्ट्राच्या विविध भागातील कवींचे होणार 4 कवी संमेलने

अंबाजोगाई : येथील आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील कवींचे “मुकुंदराज काव्यसिंधू” हे राज्यस्तरीय कवी संमेलन रविवार,दि.22 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत नगरपरिषदेच्या लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात होणार आहे. या कवी संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागातील कवींची तीन व स्थानिक 100 हून अधिक विद्यार्थी कवींचे एक असे एकूण 4 कवि संमेलने होतील अशी माहिती प्रियदर्शनी क्रिडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, सांस्कृतिक विभागप्रमुख कवि दिनकर जोशी यांनी दिली.

आद्यकवी मुकुंदराज यांचा वारसा सांगणार्‍या अंबाजोगाईमध्ये आद्यकवींच्या यात्रेनिमित्त काव्यसिंधू या महाराष्ट्रातील कवींच्या कवी संमेलनाचे आयोजन यावर्षीही करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विविध प्रांतातील कवींचे एकूण 3 व स्थानिक विद्यार्थी कवींचे एक अशी 4 संमेलने होणार आहेत. “मुकुंदराज काव्यसिंधु” राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी राजकिशोर मोदी तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.भगवानराव शिंदे, कवी प्रभाकर साळेगावकर, कवी डॉ. संजय बोरूडे, कवयित्री रचना स्वामी तसेच संयोजन समितीचे प्रमुख दिनकर जोशी यांची प्रमुख उपस्थित लाभणार आहे. या प्रत्येक कविसंमेलनाला काव्यसरिता असे संबोधण्यात आले आहे.

काव्यसरिता-1:- कवी संमेलन होणार असून या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर साळेगावकर (माजलगांव) हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रेमा कुलकर्णी, बालाप्रसाद चव्हाण, खेलबा काळे, स्मिता लिंबगावकर, लता जोशी, प्रविण काळे, संध्या शिंदे, ना.मा.पडलवार, गौरी सुहास देशमुख हे कवी सहभागी होतील.

काव्यसरिता-2:- या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय बोरूडे (अहमदनगर) हे राहणार आहेत तर प्रा. जयसिंग गाडेकर (आळे फाटा), सोमनाथ सुतार (बारामती), संदीप वाघोले (आळे फाटा), गणेश भोसले (राळेगण सिद्धी), पोपट वाबळे (बारामती), ओमप्रकाश देंडगे (पारणेर), गोविंद रोकडे (सेलु), सुनंदा शिंगनाथ(पुणे), चाफेश्‍वर गांगवे (रिसोड), डॉ.विजय काळे (वाशिम) हे मान्यवर कवींचा सहभाग राहणार आहे.

काव्यसरिता-3:- या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी रचना स्वामी या उपस्थित राहणार आहेत तर या सत्रात अंबाजोगाई शहरातील 100 हून अधिक विद्यार्थी, कवी सहभागी होतील कदाचित या संख्येत वाढही होवू शकते. अंबाजोगाई शहर व परिसरातील रसिकांनी या तीनही कवी संमेलनात उपस्थित राहून महाराष्ट्रातील कवींच्या कवितांना दाद द्यावी असे आवाहन प्रियदर्शनी क्रिडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, संयोजन समितीचे प्रमुख कवि दिनकर जोशी यांनी केले आहे.