टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर सदरील विद्यार्थ्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विषबाधेच्या घटनेमुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. सध्या ऊसतोड कामगार हे ऊसतोडणीसाठी बाहेर जिल्ह्यात आणि राज्यात गेले आहेत. ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शिक्षण बंद पडू नये, यासाठी शासनाने हंगामी वसतिगृहाची सोय केलेली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा गावातही जिल्हा परिषदेच्या शाळेत हंगामी वसतिगृह सुरु करण्यात आले आहे. या वसतिगृहात काल दिनांक 8 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांना नेहमी प्रमाणे जेवण देण्यात आले. यात वांग्याची भाजी, भात आणि भाकरी जेवण्यासाठी बनवण्यात आली होती. रात्री विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना रात्री 12 च्या सुमारास मळमळ सुरु झाली. त्यातील 6 विद्यार्थ्यांना ‘स्वाराती’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर हळूहळू आणखी विद्यार्थ्यांना मळमळ सुरु झाल्याने त्यांनाही ‘स्वाराती’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वसतिगृहातील 15 विद्यार्थ्यांवर ‘स्वाराती’ रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.