टीम AM : केज विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत नमिता मुंदडांनी बाजी मारत पृथ्वीराज साठे यांचा पराभव करीत विधानसभेत पोहचल्या. अगदी कालपरवाच त्यांनी विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली. नमिता मुंदडांनी विधानसभेत दुसऱ्यांदा शपथ घेतली. पण यंदाच्या शपथविधीत नमिता मुंदडांनी ‘जयभीम’ बोलून शपथ घेतली आहे, ही गोष्ट अभिनंदनीय आहे. याची चर्चाही सर्वत्र होताना दिसून येत असून आता तरी आमदार नमिता मुंदडा मागासवर्गीयांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
केज मतदारसंघ हा गेल्या दीर्घ काळापासून राखीव मतदारसंघ असल्याने गेल्या तीस वर्षांपासून मुंदडा कुटुंबियांची मतदारसंघात निर्विवाद सत्ता आहे. सुरुवातीला माजी मंत्री विमल मुंदडा आणि आता नंतर नमिता मुंदडा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. केज मतदारसंघ राखीव जरी असला तरी मतदारसंघातील मागासवर्गीयांचे प्रश्न अजूनही ‘जैसे थे’ असेच असून त्यांना मुलभूत गोष्टींसाठी अजूनही झगडावे लागत आहे. केज मतदारसंघातील अनेक गावात मागासवर्गीयांच्या वस्त्यात अजूनही पाणी, रस्ते, नाली, समाजमंदिर यासह अन्य विकासाच्या योजनांची उदासिनता आहे. त्यामुळे केज मतदारसंघातील मागासवर्गीयांच्या विकासाचा आलेख नेहमी खालावलेलाच दिसून येईल. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी आमदार नमिता मुंदडांनी अधिक जोमाने आणि भर देऊन काम करण्याची नितांत गरज आहे, तरच मागासवर्गीयांचे प्रश्न सुटतील.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी अनेक कायद्यांची निर्मीती केली आणि ते अमलातही आणले. मागासवर्गीयांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आरक्षणाची तरतूदही केली. त्याच आरक्षणाच्या बळावर नमिता मुंदडा दुसऱ्यांदा विधानसभेत पोहचल्या. पहिल्या टर्मला शपथ घेताना त्यांनी ‘जयभीम’ शब्द उच्चारला नाही. परंतू, दुसऱ्या टर्मला नमिता मुंदडांना बाबासाहेबांची आठवण झाली आणि त्यांनी शपथ घेताना ‘जयभीम’ शब्द उच्चारत बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे केज मतदारसंघातील मागासवर्गीयांच्या प्रश्नांकडे त्या जातीने लक्ष देतील आणि सोडविण्यासाठी प्रयत्न करतील ही अपेक्षा आता मागासवर्गीय जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
चैत्यस्मारकाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा
अंबाजोगाई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लोखंडी सावरगाव या गावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘चैत्यस्मारक’ विकासापासून ‘वंचित’ राहिले आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आहेत. लोखंडी सावरगाव येथील भीम अनुयायांनी लोकसहभागातून ‘चैत्यस्मारक’ या ठिकाणी विकासात्मक कामे केली आहेत. परंतू, त्या ठिकाणी अजूनही बरीचशी कामे होणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदार नमिता मुंदडा प्रयत्न करतील आणि त्या ठिकाणी विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करुन देतील, अशी अपेक्षा भीम अनुयायांकडून करण्यात येत आहे.
‘संघर्षभूमी’ च्या विकासासाठी प्रयत्न करावेत
अंबाजोगाई शहरातील चनई रोडवर ‘संघर्षभूमी’ आहे. भीम अनुयायांच्या संघर्षातून या भूमीची निर्मीती झाली असून त्यामुळेच या ठिकाणचे नाव ‘संघर्षभूमी’ असे ठेवले आहे. या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा जोतिबा फुले यांचा अर्धाकृती पुतळा आहे. त्यासोबतच लोकशाहीर वामनदादा कर्डक, व्ही. जे. अरक यांचे स्मारक आहे. या ठिकाणी बुद्ध पौर्णिमा, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इतरवेळी भीम अनुयायी सातत्याने भेट देत असतात. परंतू, या ठिकाणी अजूनही कुठलाही निधी विकासासाठी मिळाला नाही. आमदार नमिता मुंदडा चैत्यस्मारकाच्या आणि ‘संघर्षभूमी’ च्या विकासासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा करण्यात हरकत नाही.