टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. अंबाजोगाई – लातूर रस्त्यावरील वाघाळा पाटी नजीक ट्रक – कारच्या झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही दुर्घटना आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातातील सर्व जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या घटनेमुळे अंबाजोगाई हद्दीतील चारपदरी रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई – लातूर रस्त्यावरील वाघाळा पाटी नजीक आज सकाळी 7 वाजता लातूरच्या दिशेने निघालेली स्विफ्ट डिझायर टुरिस्ट कार आणि लातूरहुन येणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात होऊन कारचा चक्काचूर झाला. या अपघातात डिझायर कारमधून प्रवास करणारे 3 जण ठार तर 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सर्व जखमींना ‘स्वाराती’ रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मयत व जखमी हे रेणापूर तालुक्यातील कारेपूर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करित आहेत.