टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. अंबाजोगाई – लातूर रस्त्यावरील वाघाळा पाटी नजीक ट्रक – कारच्या झालेल्या भीषण अपघातात 4 जण ठार तर 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही दुर्घटना आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातातील सर्व जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, अपघातात मृत्यू पावलेले युवक हे पोलिस भरतीत निवड झालेल्या मित्राची पार्टी करण्यासाठी मांजरसुबा या ठिकाणी आले होते. सकाळी कारेपूर जि. लातूर या गावी परतत असताना त्यांच्यावर काळानं घाला घातला. या घटनेमुळे कारेपूर गावात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई हद्दीतील चारपदरी रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई – लातूर रस्त्यावरील वाघाळा पाटी नजीक आज सकाळी 7 वाजता लातूरच्या दिशेने निघालेली स्विफ्ट डिझायर टुरिस्ट कार [ एमएच 14 एलएल 6749] आणि लातूरहुन येणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात होऊन कारचा चक्काचूर झाला. या अपघातात डिझायर कारमधून प्रवास करणारे 4 जण ठार तर 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सर्व जखमींना ‘स्वाराती’ रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
या अपघात मृत्यू पावलेल्यांची नावं बालाजी शंकर माने [वय – 27], फारुख बाबुमिंया शेख [वय – 30], दिपक दिलीप सावरे [वय – 28], ऋतवीक गायकवाड [रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू] अशी आहेत तर यातील जख्मींची नावं मुबारक शेख आणि अजिम पाशुभाई शेख [ वय – 30, पोलिस भरतीत निवड] अशी आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करित आहेत.