केजमध्ये ‘रास्ता रोको’ आंदोलनाला हिंसक वळण : नेमकं काय घडलयं‌ ? वाचा…

टीम AM : मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांची सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज देशमुख कुटुंबियांशी संवाद साधला. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. याप्रकरणी मस्साजोग येथील ग्रामस्थांनी आरोपींच्या अटकेसाठी केज येथे अहिल्यानगर – अहमदपूर महामार्गावर आज दिनांक 10 डिसेंबर मंगळवार रोजी ‌’रास्ता रोको’ आंदोलन केले. 

दरम्यान, दुपारच्या सुमारास या ‘रास्ता रोको’ आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने एसटी महामंडळाची बस पेटवून दिली. पोलिस आणि आंदोलक आमने – सामने आले होते. सरपंचांच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मस्साजोग गाव गाठत देशमुख कुटुंबियांशी संवाद साधला.

मनोज जरांगे यांनी देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करत या घटनेसंदर्भात वरिष्ठ पोलिसांशी फोनवरून संवाद साधला. मनोज जरांगे म्हणाले, मस्साजोग गावच्या सरपंचाच्या हत्येची घटना दुर्दैवी आहे. बीड जिल्ह्याला कलंक लावण्याचे काम सुरू आहे. सुजाण आणि चांगल्या जनतेला वेठीस धरण्याचे, त्रास देण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे. या प्रकरणाची ‘सीआयडी’ मार्फत चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here