न्यु व्हिजन पब्लिक स्कुलला सीबीएसईचे वर्ग सुरू करण्यास मान्यता

संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी यांची माहिती

अंबाजोगाई : बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यु व्हिजन पब्लिक स्कुलला नुकताच केंद्रिय माध्यमिक शिक्षा बोर्ड, दिल्ली (सि.बी.एस.ई.) यांचा उच्च माध्यमिक विद्यालय हा दर्जा प्राप्त झाला असून त्यामुळे आता सीबीएसई अभ्यासक्रमाचे इयत्ता 11 व 12 वी वर्ग सुरू करण्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.

न्यु व्हिजन पब्लिक स्कुलला मिळालेला हा दर्जा 1 एप्रिल 2019 पासुन कार्यान्वित झाला आहे. इयत्ता 11 वी या वर्गाचे नियमित वर्ग सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार सुरू आहेत. हे विद्यार्थी त्यांची इयत्ता 12 वी वर्गाची परिक्षा मार्च – 2021 मध्ये सीबीएसई अभ्यासक्रमानुसार देतील. हा दर्जा प्राप्त करणारी न्यु व्हिजन पब्लिक स्कुल ही अंबाजोगाईतील पहिलीच शाळा आहे.

विद्यार्थी,पालक,शिक्षक आणि संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेविषयी आस्था असणा-या सर्वांच्या दृष्टीने ही खुप अभिमानास्पद बाब आहे. 2003 साली बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यु व्हिजन पब्लिक स्कुलला सीबीएसई अभ्यासक्रमानुसार इंग्रजी शाळा सुरू करण्यास केंद्रिय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिल्ली यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर 2004 साली सदर शाळा ही अंबाजोगाईतील गुरूवार पेठ या ठिकाणी सुरू करण्यात आली. सलग तीन वर्षे या ठिकाणी शाळा सुरू होती. विद्यार्थी व पालकांचा वाढता प्रतिसाद मिळाल्याने सदरील शाळा ही शहरा लगत असणा-या रिंगरोड नजीकच्या मोदी लर्निंग सेंटर या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आली.

न्यु व्हिजन पब्लिक स्कुलला सीबीएसईचा उच्च माध्यमिक विद्यालयाचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी, मार्गदर्शक प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी, डॉ. डी. एच.थोरात, प्रा. वंतसराव चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष भूषण मोदी, संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी, शाळेचे प्राचार्य रोशन नायर या सर्वांचे अभिनंदन होत आहे.