अंबाजोगाईचे कौशल्य विकास केंद्र रखडले : ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना तडा, वाचा…!

लोकप्रतिनिधी आणि विद्यापीठ प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष..!

टीम AM : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत अंबाजोगाई येथे प्रस्तावित कौशल्य विकास केंद्रासाठी शहरातील सुमारे 25 एकर जागा विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे लोकप्रतिनिधी आणि विद्यापीठ प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष होत असल्याची चर्चा अंबाजोगाईत  रंगली आहे.

दोन दिवसांपूर्वी विद्यापीठाचा तब्बल 359 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. मात्र, या अर्थसंकल्पात अंबाजोगाईच्या कौशल्य विकास केंद्रासाठी छदामही तरतूद करण्यात आलेली नाही. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने या प्रकल्पाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने हे केंद्र कागदावरच राहणार का ? असा सवाल विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

अंबाजोगाईसह बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्याधारित आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगारक्षम शिक्षण मिळून परिसराच्या शैक्षणिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

परंतू, अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. संबंधित लोकप्रतिनिधींनी व विद्यापीठ प्रशासनाने या प्रकल्पाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक निधीची तरतूद करावी व कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीस गती द्यावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here