अंबाजोगाईत अवकाळी पाऊस : जनजीवन विस्कळीत…!

टीम AM : अंबाजोगाई शहरासह तालुक्यात आज‌‌सांयकाळी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. काही भागांत जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांची धावपळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली, तर  दुचाकीस्वार आणि पादचारी यांना आसरा शोधावा लागला.

अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागातही पावसाचा फटका बसला असून काही ठिकाणी उभ्या पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. विशेषतः ज्वारी, गहू आणि हरभरा पिकांवर परिणाम झाल्याची शेतकऱ्यांकडून तक्रार करण्यात येत आहे. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन अंबाजोगाई तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.