‘गुड न्यूज’ : प्राचीन बौद्ध स्थळ ‘सारनाथ’ चा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

टीम AM : ‘युनेस्को’ ने (UNESCO) भारताचे प्राचीन बौद्ध स्थळ ‘सारनाथ’ चा जागतिक वारसा स्थळांच्या (World Heritage Site) यादीत समावेश केल्याची घोषणा केली आहे. युनेस्कोने आपल्या अधिकृत ‘X’ हँडलवरून ‘ब्रेकिंग ! युनेस्को विश्व वारसा यादीत नवीन नाव: सारनाथ, भारताचे प्राचीन बौद्ध स्थळ’ अशी पोस्ट केली.

या ऐतिहासिक घोषणेवर आनंद व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी लिहिले, प्रत्येक भारतीयासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. उत्तर प्रदेशातील सारनाथला ‘युनेस्को’ च्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याचा मला अतिशय आनंद आहे. सारनाथचा भगवान बुद्धांशी अतिशय जवळचा आणि गहिरा संबंध आहे. त्यांचे ज्ञान, करुणा आणि सद्भावाचा शाश्वत संदेश संपूर्ण जगाला प्रेरणा देतो. ही मान्यता भारताच्या अथांग सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा गौरव करते. यामुळे जगभरातील जास्तीत जास्त लोक सारनाथला भेट देतील आणि भगवान बुद्धांच्या विचारांशी जोडले जातील.

उत्तर प्रदेशातील वाराणसीपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेले सारनाथ हे जगभरातील बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी आपले पहिले उपदेश (धम्मचक्कपवत्तन) याच ठिकाणी दिले होते. त्यामुळे जागतिक इतिहासात आणि बौद्ध तत्त्वज्ञानात सारनाथला अत्यंत अनन्यसाधारण स्थान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here