अंबाजोगाईत पकडलेल्या श्वानांचे मृतदेह आढळल्याने खळबळ ; मृत्यूचे कारण काय ? वाचा…!

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेने काही दिवसांपूर्वी शहरातील भटक्या श्वानांना पकडून नेले होते. दरम्यान, या श्वानांचे मृतदेह सर्वे क्रमांक 17 परिसरात आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या श्वानांचा मृत्यू नेमका कसा झाला ? त्यांना विषबाधा झाली का ? अथवा अन्य कोणत्या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत सोशल मिडियावर फोटो टाकत तीव्र नाराजी व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. नगरपरिषदेने पकडून नेलेल्या श्वानांचे मृतदेह एकाच परिसरात आढळल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. या प्रकरणात संबंधित श्वानांचा मृत्यू नैसर्गिक होता की त्यामागे अन्य कारण आहे ? हे अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

अंबाजोगाईकरांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली असून, संबंधित प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

श्वान मृत्यूप्रकरणी काँग्रेसचा इशारा

अंबाजोगाई नगर परिषदेकडून शेकडो श्वानांची हत्या झाल्याचा आरोप करत संबंधित कंत्राटदार, अधिकारी आणि नगरपरिषदेच्या प्रमुखांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिजीत लोमटे यांनी केली आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास काँग्रेसच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here